prithviraj chavhan on bullet train | Sarkarnama

बुलेट ट्रेनला विरोध केल्याने सुरेश प्रभुंना मोदींनी हटविले : पृथ्वीराज चव्हाण 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

बुलेट ट्रेन नफ्यात चालणार नाही हे तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभुंनी सांगूनही केवळ व्यक्तीगत प्रतिष्ठेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तो सुरू करण्याचा घाट घातला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कऱ्हाड येथे पत्रकार परिषदेत दिली. 

सातारा : बुलेट ट्रेन नफ्यात चालणार नाही हे तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभुंनी सांगूनही केवळ व्यक्तीगत प्रतिष्ठेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तो सुरू करण्याचा घाट घातला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कऱ्हाड येथे पत्रकार परिषदेत दिली. 

केवळ तोट्यात जाणार म्हणून तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी बुलेट ट्रेनला विरोध केला होता. केवळ आपल्या प्रतिष्ठेसाठी मोदींनी श्री. प्रभुंना हटवून त्याजागी त्यांच्या मर्जीतील रेल्वेमंत्री म्हणून पियुश गोयल यांना आणले. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे उद्‌घाटनाचा घाट घातला. एकीकडे तोट्यातील बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू करतानाच दुसरीकडे कऱ्हाड चिपळूण रेल्वे मार्गाचा प्रस्ताव रद्द करण्याचा घाट घातला आहे. हे आम्ही कदापी सहन करणार नाही. मुळात भाजपच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कुठेही बुलेट ट्रेनचा उल्लेख नव्हता. पण मोदींनी आपल्या हट्टापोटी एक लाख दहा कोटींचा हा प्रकल्प सुरू केला आहे. आम्ही कऱ्हाड चिपळूण रेल्वे मार्गाचा प्रस्ताव रद्द होऊन देणार नाही. प्रसंगी मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी धरून हा प्रस्ताव त्यांना पुन्हा सुरू करण्यास भाग पाडू. 

शेतकरी कर्जमाफी ही पूर्णपणे फसली असून कर्जमाफीसाठी अर्ज भरण्यासाठी मुदत कशाला हवी, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. सनदी अधिकारीच भाजपचे सरकार चालवत असून सरकार चालविण्यासाठीच मोदींनी सनदी अधिकाऱ्यांना नेमल्याची टिका श्री. चव्हाण यांनी केली. सुभाष देसाई, बडोले या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केले आहे. पण त्यांचे राजीनाम घेतले जात नाहीत. त्यामुळे याप्रकरणी निवृत्त न्यायाधीशाच्या समितीच्या माध्यमातून या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे यासाठी आम्ही आग्रही भुमिका घेणार असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले. 

संबंधित लेख