Pritam Munde will get a lead of 25 thousand vootes from Kej : Sangita Thombre | Sarkarnama

 केजमधून प्रितम मुंडेंना किमान २५ हजार मतांची आघाडी  : संगीता ठोंबरे

रामदास साबळे
रविवार, 12 मे 2019

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेली विकास कामे, ५० वर्षांपासून अपूर्ण असलेले रेल्वेचे स्वप्न पूर्णत्वाकडे जात आहे. पिक विमा, नुकसान भरपाई आणि प्रधानमंत्री किसान योजनांच्या माध्यमांतून शेतकऱ्यांना मोठी मदत झाली. त्यामुळे सर्वसामान्य घटकांनी भाजपच्याच पारड्यात मते टाकली .  - भाजप आमदार संगीता ठोंबरे.

केज (जि. बीड) : "नेत्यांनी जातीवाद केला असला तरी सामान्य मतदारांनी विकासाच्या मुद्द्यांवर भाजपच्याच पारड्यात मते टाकली. केज मतदार संघात विणले गेलेले रस्त्याचे जाळे, पाणी योजना, विविध कार्यालयांच्या इमारती, गावांतर्गत रस्ते - नाल्या अशी विविध विकास कामे पालकमंत्री पंकजा मुंडे आणि खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या माध्यमातून झाली."

" आम्ही विकास कामांच्या जोरावर मते मागीतली आणि त्याला प्रतिसाद मिळाला. विरोधकांचा काहीही दावा असला तरी केज मतदार संघातून भाजपच्या उमेदवार खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना किमान २५ हजार मतांची लिड मिळेल  आणि त्या दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रमाणाचे लाखांवर मतांनी विजयी होतील," असा विश्वास भाजपच्या आमदार संगीता ठोंबरे यांनी व्यक्त केला. 

बीड लोकसभा मतदार संघात भाजपच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यात सरळ लढत झाली. शेवटपर्यंत चुरशीच्या या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मतदानानंतरही दोन्ही गोटांत विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.

 या पार्श्वभूमीवर केजच्या आमदार संगीता ठोंबरे यांच्याशी बातचित केली. संगीता ठोंबरे म्हणाल्या," मागच्या ५० वर्षांपासून जिल्हावासियांचे अपूर्ण असलेले रेल्वेचे स्वप्न पंकजा मुंडे व प्रितम मुंडे यांच्यामुळे पुर्णत्वाकडे जात आहे. या लोहमार्गाला भरीव निधी मिळाला असून कामही वेगात आहे. नुकतीच या लोहमार्गाची चाचणीही झाली. या लोहमार्गामुळे जिल्ह्याचा वेगाने विकास होणार असल्याचे सामान्य, नोकरदार आणि व्यापारी वर्गाला माहित आहे. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना कोणी बळी पडले नाही."

 संगीता ठोंबरे म्हणाल्या ," विरोधी पक्षाने जातीवादी प्रचार केला असला तरी सर्वच समाज घटकांच्या मतांचा टक्का भाजपलाच अधिक असल्याचे दिसते. पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून २५/१५ अंतर्गत प्रत्येक गावांत सभागृह, रस्ते, नाल्यांसाठी जिल्हाभरात शेकडो कोटी रुपयांचा निधी दिला. विविध देवस्थांना निधी मिळाला आहे. इतिहासात कधी नव्हे तेवढा निधी पंकजा मुंडे व प्रितम मुंडे यांच्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून रस्त्यांना मिळाला आहे. अनेक कामे पूर्ण झाली आणि उर्वरित वेगाने सुरु आहेत. जिल्ह्यातील मतदार जाणकार असल्याने चर्चा काहीही असली तरी मत देताना भाजपकडेच कल होता हे आता समोर येत आहे. "

"केंद्र सरकाच्या माध्यमातून झालेल्या उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री किसान योजना, जनधन योजना, शेतकरी पेन्शन योजना अशा विविध योजनांतून सामान्यांना थेट लाभ झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातून भाजपला एक लाखांहून अधिक मतांची लिड मिळून डॉ. प्रितम मुंडे यांचा विजय निश्चित होईल," असा विश्वस संगीता ठोंबरेंनी व्यक्त केला. तर, केजमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार स्थानिक असल्याने सहानुभूती मिळण्याचा विरोधकांचा विश्वास फोल ठरणार आहे. या मतदार संघातही पंकजा मुंडे व प्रितम मुंडे यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांनाच मतदारांनी कौल दिल्याचा विश्वास आहे. केज मतदार संघातून भाजपला किमान २५ हजार मतांची लिड मिळणार  आहे, असेही त्या म्हणाल्या . 

संबंधित लेख