Pritam Munde arrranges health camp | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

प्रितम मुंडे दोन दिवस खासदारकी विसरून पुन्हा डॉक्टर झाल्या !

दत्ता देशमुख 
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

राज्यभरात गोवर - रुबेला लसीकरणाबाबत पालकांमध्ये गैरसमज आणि भिती आहे. मात्र, या लसीचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत हे दाखविण्यासाठी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी स्वत:चा मुलगा अगस्त्यला ही लस टोचली.

बीड : प्रितम मुंडे खासदार असल्या तरी आपण पहिले डॉक्टर असल्याचे त्या सांगत असतात. त्यांच्यातला पुर्णवेळ डॉक्टर गोपीनाथ गडावर आयोजित आरोग्य शिबीरातून दिसला. संयोजक असलेल्या डॉ. प्रितम मुंडेंनी केवळ नियोजन केले नाही तर स्वत: रुग्णांची तपासणी करुन उपचारही केले. 

विशेष म्हणजे, सर्वत्र गोवर - रुबेला लसीकरणाबाबत समज - गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर लसीचे दुष्परिणाम नाहीत हे सांगण्यासाठी स्वत:चा मुलगा अगस्त्यला त्यांनी स्वत: ही लसही टोचली.

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त गोपीनाथगडावर खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या पुढाकाराने दोन दिवसीय आरोग्य शिबीर झाले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानच्या संयुक्त सहकार्याने झालेल्या शिबीरासाठी साधारण २०० तज्ज्ञ डॉक्टर आणि मोठ्या प्रमाणात मनुष्यबळही उपलब्ध होते. 

संयोजक आणि खासदार असल्याने केवळ नियोजन करणे आणि सुचना देणे एवढेच काम त्यांच्याकडे असणार होते. पण, खासदार असण्यापूर्वी आपण डॉक्टर असल्याचे सांगणाऱ्या डॉ. मुंडेंनी या दोन दिवसांत आपल्या गळ्यातला स्टेथोस्कोप खालीच पडू दिला नाही. 

वैद्यकीय पदवी (एमबीबीएस) आणि सौंदर्यशास्त्रातील पदव्युत्तर पदवी (डर्मेटोलॉजीस्ट) असणाऱ्या डॉ. मुंडेंनी त्वचा आजाराबाबत तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची खुद्द तपासणी करुन उपचार तर केलेच. शिवाय एमबीबीएस असल्याने इतर रुग्णांचीही त्यांनी या दोन दिवसांत तपासणी करुन उपचार केले. खुद्द खासदारच तपासणी करत असल्याच्या समाधानातून रुग्णांचा निम्मा आजार अगोदरच बरा झाला असणार हे वेगळे. दरम्यान, या शिबीरात साडेसात हजार रुग्णांची तपासणी करुन उचार देण्यात आले. 

 

संबंधित लेख