prison dig swati sathe's press in kolhapur | Sarkarnama

नकली रिव्हॉल्वर 'दाखवून' संतोष पोळने अधिवेशन काळात DIG स्वाती साठेंचे टेन्शन वाढवले!  

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हत्यारे बनवण्याचे काम डॉ. पोळकडे होते.

कोल्हापूर : कळंबा कारागृहातील डॉ. संतोष पोळच्या ज्या व्हायरल व्हिडीओने खळबळ उडवली, त्या व्हीडीओ मधील रिव्हॉल्व्हर नकली असल्याचा खुलासा आज कारागृह विभागाच्या पोलीस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी केला आहे. 

अधिवेशनाच्या काळातच या व्हिडीओ व्हायरल झाल्याने कारगृह विभागाच्या अधिकाऱ्यांचीही चांगलीच तारंबळा उडाली. यानंतर तात्काळ पोलीस उपमहानिरीक्षक साठे यांनी कोल्हापुरला भेट देत चौकशी करुन याबाबतची सविस्तर माहिती दिली. 

कारागृहात मोबाईल येणे ही गंभीर बाब असून मृत्युचा बनाव करणाऱ्या अमोल पोवार या कैद्याच्या माध्यमातून हा मोबाईल डॉ. पोळ पर्यंत पोहचला आहे. मात्र तो कोणत्या मार्गाने कारागृहात आला याची चौकशी सुरु केली असून यामध्ये कारागृहाचे दहा कर्मचारी रडारवर असल्याची माहिती साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अवैध वस्तू कारागृहात आणून कारागृहाची जाणीवपूर्वक बदनामी केल्याबद्दल डॉ. पोळ सह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी दिली आहे. 

व्हायरल व्हिडओ मध्ये दिसणारे रिव्हॉल्वर हे नकली असून थर्मोकोल, साबण फेव्हीकोल व कलर चा वापर करून तयार केले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हत्यारे बनवण्याचे काम डॉ. पोळ कडे होते. त्याचवेळी त्याने अन्य एक रिव्हॉल्वर तयार करून आपल्या कडे ठेवले असण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित लेख