priority for devendra fadnvis : SarkarnamaSurvey | Sarkarnama

पुन्हा देवेंद्र फडणवीसच हवेत! : सरकारनामाच्या सर्वेक्षणातील कौल

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

राज्यात २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाली तर महाराष्ट्राचा कौल काय असेल, याचा कानोसा सरकारनामाने घेतला. राज्यभरात झालेल्या या सर्वेक्षणात महाराष्ट्राचे राजकीय चित्र समोर उभे राहिले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी कोणाला पसंती राहणार, या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने आहे.

पुणे : पुढच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत, या प्रश्नाला उत्तर देताना सरकारनामाच्या सर्वेक्षणात सर्वाधिक पसंती देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मिळाली आहे. "केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र' अशी घोषणा देत भाजपने देवेंद्र फडणवीसांचा विधानसभा  निवडणुकांच्या आधी चेहरा समोर आणला होता. पुढल्या खेपेलाही मीच मुख्यमंत्री असणार आहे, काळजी करू नका, असे विधान फडणवीसांनी नुकतेच एका सभेत केले होते.

महाराष्ट्रातल्या बहुसंख्य मतदारांनाही फडणवीसांचा हा विश्वास अनाठायी वाटत नाही, असे या सर्वांत ताज्या सर्वेक्षणावरून दिसते.सर्वेक्षणात सहभाग नोंदवलेल्या एकूण मतदारांपैकी 20 टक्के लोकांनी पुढील निवडणुकीनंतरचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. फडणवीसांच्या खालोखाल पसंती आहे ती अजित पवार यांच्या नावाला.

या यादीत पुढे आहेत उद्धव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण (प्रत्येकी 13 टक्के), नितीन गडकरी आणि सुप्रिया सुळे (प्रत्येकी 10 टक्के), राज ठाकरे (5 टक्के) आणि नारायण राणे (1 टक्का). अन्य प्रश्नांना मिळालेल्या प्रतिसादाप्रमाणेच व्यापार उद्योगक्षेत्राचा फडणवीस आणि त्यांच्या सरकारला असलेला पाठिंबा आणि शेतकरी मतदारांची नाराजी या प्रश्नांच्या उत्तरातही दिसते.

या सर्वेक्षणात सहभागी झालेले व्यापार-उद्योगक्षेत्रातल्या 22 टक्के लोकांना फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटते, तर 23 टक्के शेतकरी मतदारांनी अजित पवारांवर पुढचे मुख्यमंत्री म्हणून शिक्का उमटवला आहे. फडणवीसांच्या नावाला 15 टक्के शेतकरी मतदारांची पसंती आहे.

संबंधित लेख