Presidential election : Sushama Swaraj front runner in BJP | Sarkarnama

राष्ट्रपती पदासाठी भाजपमध्ये सबकी पसंद सुषमा...?

मंगेश वैशंपायन - सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 जून 2017

अडवाणींच्या शब्दाला महत्व 

अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणेच सर्वसहमतीनेच राष्ट्रपती निवडण्याचा मोदींचा अट्टाहास असेल तर आजच्या घडीला सुषमा स्वराज यांच्याशिवाय दुसरे नावच त्यांच्यासमोर नाही असे भाजप सूत्रांनी नमूद केले. मात्र शस्त्रक्रियेनंतर सक्रिय झालेल्या सुषमा स्वराज राष्ट्रपतिपदाचा फुलस्टॉप लावून घेण्यास तयार आहेत का, हा खरा प्रश्‍न आहे. अडवानींची इच्छा म्हटल्यावर त्या नकार देऊ शकणार नाहीत असा भाजपचा होरा आहे.

नवी दिल्ली:  राष्ट्रपतिपदाच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आता परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे नाव आता आघाडीवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे . 

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याआधी 22 तारखेपूर्वी  भाजपतर्फे राष्ट्रपती पदासाठी आपला उमेदवार कोण आहे हे जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

मात्र स्वतः सुषमा स्वराज यांनीच हे पद  स्वीकारण्यास नकार दिला तर  ऐनवेळी मोदी आपल्या मनातील व अतिशय नवख्या उमेदावारचे नाव ऐनवेळी पुढे करून धक्का देऊ शकतात असे समजते. 

उत्कृष्ट वक्‍त्या व उत्तम प्रशासक असलेल्या सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून आपली छाप पाडली आहे. जयप्रकाश आंदोलनाची देणगी असलेल्या सुषमा स्वराज यांचे सोनियांसह सर्व पक्षीय नेत्यांशी उत्तम संबंध आहेत. 

सुषमा स्वराज यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून काम करताना जगभरात विविध देशात अडचणीत सापडलेल्या भारतीय नागरिकांना जलद मदतीचा वस्तुपाठ घालून दिला आहे . 

भाजपमधील जुन्या आणि नव्या पिढला सांधणारा दुवा म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते . संपूर्ण देशातील विविध राज्यातील भाजपाच्या नेत्यांशी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी त्यांचे चांगले संबंध राहिलेले आहेत . विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांशीही त्यांचे सौहार्दाचे आणि चांगले संबंध राहिलेले आहेत . 

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठीच्या वेगवान घडामोडी राजधानीत घडत आहेत. या पदासाठी भागवतांसह द्रौपदी मुर्मू, मेट्रो-मॅन श्रीधरन, एम. एस. स्वामिनाथन, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर आदी नावांच्या चर्चा अखंड सुरू होत्या.

विरोधकांशी चर्चा करण्यासाठी सत्ताधारी भाजपने नेमलेल्या तीन मंत्र्यांच्या समितीमधील गृहमंत्री राजनाथसिंह आणि माहिती व प्रसारणमंत्री वेंकय्या नायडू यांनी आज सकाळी साडेअकराच्या सुमारास सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे हे यावेळी उपस्थित होते. 
सुमारे अर्धा तास चाललेल्या या चर्चेत कोणत्याही नावावर चर्चा झाली नसल्याचे आझाद यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राजनाथसिंह आणि नायडू या मंत्रिद्वयींनी दुपारी सव्वातीनच्या सुमारास माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचीही भेट घेऊन संभाव्य नावाबद्दल त्यांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. येचुरी यांनीही भाजपचा प्रस्ताव काय आहे, अशी विचारणा करून पाठिंब्यासाठी उमेदवार धर्मनिरपेक्ष विचासरणीचाच असावा, अशी अट घातली.

राजनाथसिंह आणि नायडू यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी "कॉन्फरन्स कॉल'द्वारे सविस्तर चर्चा केली. 

राजनाथसिंह आणि  वेंकय्या नायडू यांनी  सायंकाळी भाजपचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवानी यांची भेट घेतली. विशेषतः अडवानी यांना भेटून दोन्ही नेत्यांच्या वाहनांचा ताफा बाहेर पडल्यावर सुषमा स्वराज यांच्या नावाची चर्चा अतिशय गंभीरपणे सुरू झाली.

अडवानी यांनी चार वर्षांपूर्वीच सुषमा स्वराज यांच्या नावास पहिली पसंती दिली होती. राजनाथसिंह व नायडू यांच्याशी भेटीतही अडवानी यांनी आपल्या मताचा पुनरुच्चार केल्याचे समजते.  

सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भोजनाच्या निमित्ताने भेट घेतली. राष्ट्रपती भवनात उभयतांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. ही फेअरवेल भेट असल्याचे सांगण्यात आले. 

संबंधित लेख