Presidential election : BJP trying to split opposition votes | Sarkarnama

राष्ट्रपती निवडणूकीच्या निमित्ताने भाजपचे महाराष्ट्रात  शक्तिप्रदर्शन ?

संदीप खांडगेपाटील : सरकारनामा न्युज ब्युरो
रविवार, 2 जुलै 2017

भाजपमध्येही नाराजी 
भाजपमध्येही काही आमदार नाराज आहेत . त्यांच्या मतदारसंघासाठी आवश्यक त्या निधीची तरतूद होत नाही . पक्षात मोकळेपणाने  बाजू मांडू दिली जात नाही . अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले तेंव्हा त्यांचा पवित्रा ऐकून घेण्यापेक्षा रेटून सांगण्याचा आणि आदेश देण्याचा होता अशी काही आमदारांची तक्रार आहे . मुख्यमंत्र्यावरही भाजपचे काही आमदार आणि नेते नाराज आहेत पण काँग्रेसकडून केवळ प्रतीकात्मक लढाई सुरु असल्याने नाराज मंडळींना पर्याय नाही . शरद पवार यांच्यासारखा प्रबळ उमेदवार विरोधी पक्षाकडून असता तर महाराष्ट्रात चित्र वेगळे दिसले असते . भाजपचीही काही मते फुटली असती . पण सध्यातरी भाजपमधील नाराज आमदारांसमोर पर्याय नाही . 

मुंबई : राष्ट्रपती निवडणूक भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. महाराष्ट्रात  भाजप  अतिरिक्त मतांची जमवाजमव करत आहे. शिवसेनेला आपले बळ दाखवून द्यायचे या निर्धाराने भाजपमधील काही नेत्यांनी  काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांना मतदानाकरिता फोडण्याची मोहीम हाती घेतली आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला असला तरी पाठिंबा देण्यासाठी बरेच आढेवेढे घेतले . मोहन भागवत आणि स्वामिनाथन यांचे नावेही सुचविली . खरेतर भाजपला शिवसेनेकडून बिनशर्त पाठिंब्याची अपेक्षा होती . तसेच सर्वात जुना मित्र पक्ष म्हणून शिवसेनेने  सर्वात आधी पाठिंबा द्यायला हवा होता असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटते .  

शिवसेना सतत पाठिंबा काढण्याची भाषा बोलत आहे. सरकारला उद्धव ठाकरे वारंवार इशारे देत आहेत . त्यामुळे शिवसेनेच्या वाघाच्या डरकाळ्या बंद करण्यासाठी भाजपला  हे पाऊल उचलावे लागले आहे .   यातून  शिवसेनेला करून दाखवण्याची  खेळी भाजप खेळत आहे.राष्ट्रपती निवडणुकीच्या माध्यमातून भाजपकडे असलेल्या आमदारांची संख्या शिवसेनेला कळण्याकरिता भाजपने कंबर कसली आहे .

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्यावरून शिवसेनेने फार काळ तळ्यात-मळ्यात केल्याने अस्वस्थ झालेल्या भाजप नेतृत्वाने महाराष्ट्रातून मते मिळविण्यासाठी एक महिन्यापूर्वीच विरोधी पक्षांच्या आमदारांशी सुसंवाद योजना राबविली असल्याचे समजते . या सुसंवादास अनुकूल प्रतिसाद देणार्‍या विरोधी पक्षांच्या आमदारांच्या गरजांची काळजी घेण्याची तयारीही भाजपने पूर्ण केली असल्याचे समजते . 

विरोधी पक्षांच्या  आमदारांना मतदारसंघात विकासासाठी भरघोस निधी देण्याचे  आमिष दाखविले गेले . तर आपतधर्म योजनेचा विस्तार करून येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे तिकीट आणि निवडणूक खर्च देण्याबाबतही संवाद साधण्याचे प्रयत्न झाले आहेत .  मात्र विरोधी पक्षातील काही आमदारांना इतकी दूरदृष्टी अमान्य असल्याने त्यांच्यासाठी तात्काळ योजनाही सादर करण्यात आल्याचे समजते .  संपर्कात असलेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांना सांभाळणार्‍या कार्यकर्त्याचीही पक्ष विशेष दखल घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना साथ देणार नाही असे गृहीत धरूनच भाजपने ही मोर्चेबांधणी मागील 1-2 महिन्यापासून सुरू केली आहे. राष्ट्रपती निवडणुकीकरिता मतदानासाठी  काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे काही  आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्वी हा आकडा मोठा  होता, पण शेतकरी आंदोलन,कर्जमाफी यामुळे विरोधी पक्षाच्या काही आमदारांनी यु- टर्न घेतल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेनेने राष्ट्रपती निवडणूकीकरिता भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असला तरी शिवसेनेचे आमदार व खासदार भाजपला कितपत प्रामाणिकपणे मतदान करतील यावरही प्रश्‍नचिन्ह कायम आहे. भाजपने सत्ता सांभाळताना शिवसेनेला तुलनेने नगण्य स्थान दिले आहे. शिवसेना मंत्र्यांना फारसे अधिकार नाहीत. शिवसेना आमदारांची सरकार असतानाही फारशी कामे होत नाही याची नाराजी शिवसेनेच्या आमदारांकडून व्यक्त केली जात आहे.

 राष्ट्रपती निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना आमदार आपल्या मतदारसंघाकरिता अतिरिक्त निधी अथवा विकासाच्या पॅकेजचीही मागणी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच एकीकडे काँग्रेसचे काही घटक शिवसेनेशी सलगी साधताना तर दुसरीकडे भाजपमधील मातब्बर घटक काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांशी विशेष सलगी साधताना पहावयास मिळत आहेत . 

राष्ट्रवादी काँग्रेसचे  पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील तटकरे, वळसेपाटील यांचा राष्ट्रवादीच्या आमदारांशी  प्रत्यक्ष संपर्क आहे. राष्ट्रवादीतर्फे प्रत्येक नेत्यावर विशिष्ट आमदारांची जबाबदारी देण्यात आली आहे असे समजते .  तुलनेने काँग्रेसच्या आमदारांवर पक्षाचा फारसा दबाव नसल्याने ती मते लवकरच फुटण्याचा विश्‍वास भाजपकडून व्यक्त केला जात आहे.

फोडाफोडीच्या राजकारणाची जुळवाजुळव महाराष्ट्रात सुरू झाल्यामुळे राष्ट्रपती निवडणूकीत ‘क्रॉस व्होटींग’ होण्याची भीती प्रत्येक पक्षाच्या नेतेमंडळींकडून नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली जात आहे. 

संबंधित लेख