नगरमधल्या आर्मर्ड कोअर सेंटरचा अविस्मरणीय गौरव

नगरमधल्या आर्मर्ड कोअर सेंटरचा अविस्मरणीय गौरव

नगर : सोहळा दिमाखदार कसा व्हावा, याचे उदाहरण म्हणजे शनिवारी झालेला राष्ट्रपतींच्या उपस्थितीतील सोहळा. देशाच्या सर्वोच्च पदस्थ व्यक्तीच्या उपस्थितीतील कार्यक्रमही तितक्‍याच ताकदीचा असावा, आर्मड कोअरचा गौरव त्याच सेंटरच्या भूमीत व्हावा, ही बाब नगरकरांच्या दृष्टीने गौरवशाली, तर सैन्यदलांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची व अविस्मरणीय ठरली. 

लष्कराने केलेल्या उल्लेखनीय देदीप्यमान कारकिर्दीबद्दल आर्मर्ड कोअर सेंटर ऍण्ड स्कूलला (एसीसीएस) तिन्ही दलाचे प्रमुख तथा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सन्मानपूर्वक ध्वज प्रदान करण्यात आला. शनिवारी झालेल्या या कार्यक्रमाची तयारी मागील आठ दिवसांपासून सुरू होती. शुक्रवारी संध्याकाळी राष्ट्रपती नगरला मुक्कामी आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लष्करी तळावर त्यांचे स्वागत केले. जनरल बिपिन रावत, लेफ्टनंट जनरल डी. आर. सोन, एसीसीएसचे कमांडंट मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील, नगरच्या महापौर सुरेखा कदम, विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चोबे, पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, जिल्हाधिकारी अनिल कवडे आदींनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. अहमदनगर कॉलेजच्या प्रांगणात त्यांच्यासाठी हेलिपॅड तयार करण्यात आले होते. 
कवचित कोअर सेंटर ऍण्ड स्कूलच्या परेड ग्राउंडवर शनिवारी सकाळी नऊ वाजता राष्ट्रपतींचे आगमन झाले. त्यांना लष्करातील जवानांनी मानवंदना दिली. ढोलाच्या निनादात लष्कराचे ध्वज सन्मानपूर्वक ठेवण्यात आले. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्‍चन धर्मगुरूंनी सर्वधर्मीय पूजा करीत वंदन केले. लष्कराने मानवंदना देताना त्यामध्ये अश्वदल, बॅण्डपथकाचा समावेश होता. पायदळ, घोडदळ आणि चिलखती दलाने दिलेली मानवंदना स्मरणीय राहिली. 
अजेय, भीष्म, अर्जुन या रणगाड्यांसह इतर रणगाड्यांच्या तोफेची सलामी आकर्षक ठरली. अश्वसैनिक, लष्कराचे उच्चपदस्थ अधिकारी, जवान, सरदार असा ताफा सलामीसाठी होता. या सोहळ्याच्या दरम्यान वायुदलाच्या वतीने तीन हेलिकॉप्टरची सलामी झाली. सुखोई- या प्रकारातील तीन विमानांनी प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. भारताचा तिरंगा फडकावीत त्यांनी आगळेवेगळे प्रदर्शन घडवीत मानवंदना दिली. 
ध्वज प्रदान करण्याचा मुख्य कार्यक्रम दिमाखदार झाला. राष्ट्रपतींच्या हस्ते मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांनी सन्मानपूर्वक प्रेसिडेन्टस स्टॅण्डर्ड ध्वजाचा स्वीकार केला. या वेळी लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी, लेफ्टनंट जनरल पी. ए. हारीजा, जनरल बिपिन राणावत या लष्करातील प्रमुख अधिकाऱ्यांना मानवंदना देण्यात आली. सूत्रसंचालन नेहा कपूर व कर्नल जे. के. सिंग यांनी केले. 
आपल्या भाषणातून राष्ट्रपतींनी आर्मर्ड कोअरचा विशेष गौरव केला. ते म्हणाले, आर्मर्ड कोअर सेंटर ऍण्ड स्कूलला साठ वर्षांची परंपरा आहे. लष्कराच्या घोडदळ, पायदळ व चिलखती दलाचे येथे प्रशिक्षण होते. देशाच्या उज्ज्वल परंपरेत नगरमधील या सेंटरचे काम अत्यंत कौतुकास्पद आहे. भविष्यात ही परंपरा कायम राहील, याचा मला विश्वास आहे. या सेंटरला प्रेसिडेंट्‌स स्टॅण्डर्ड ध्वज प्रदान करणे हा माझ्या आयुष्यातील भाग्याचा क्षण होय. राष्ट्रपतींच्या या भाषणाने नगरच्या आर्मर्ड कोअर सेंटरच्या शिरपेचात मानाचा एक तुरा रोवला गेला. सैन्याला प्रशिक्षण देण्यात जगभरात प्रसिद्ध असलेल्या या सेंटरचा हा गौरव अविस्मरणीय ठरला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com