President Election News Chagan Bhujbal | Sarkarnama

भुजबळाना मतदानाच्यावेळी कोण कोण भेटणार?

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 जुलै 2017

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात अटकेत असलेले भुजबळ हे गेले 15 महिने सलग कारागृहात आहेत. मात्र भुजबळ यांना 17 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणेला ही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आर्थर रोड काराग्रहापासून विधिमंडळ प्रवेशद्वारापर्यंत स्थानिक पोलिसाना बंदोबस्त द्यावा लागणार आहे.

मुंबई - सध्या कारागृहात असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांना राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. कारागृहात असताना मतदारसंघातील प्रश्न पत्राद्वारे मांडणाऱ्या भुजबळ यांना मतदानाच्या निमित्ताने विधिमंडळ परिसरात जाण्याची संधी मिळणार आहे. मतदान करण्यासाठी अर्धा तासाची सवलत न्यायालयाने दिली असली तरी ते विधिमंडळ आवारात किती वेळ असणार? त्यांना कोण आमदार खासदार भेटणार अशी चर्चा ऐकायला येऊ लागली आहे. तसेच कारागृह ते विधिमंडळ या दरम्यानची सुरक्षेची काळजी पोलीस यंत्रणेला घ्यावी लागणार आहे.                     

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात अटकेत असलेले भुजबळ हे गेले 15 महिने सलग कारागृहात आहेत. मात्र भुजबळ यांना 17 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणेला ही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आर्थर रोड काराग्रहापासून विधिमंडळ प्रवेशद्वारापर्यंत स्थानिक पोलिसाना बंदोबस्त द्यावा लागणार आहे. त्यानंतर विधिमंडळ सुरक्षा यंत्रणेवर भुजबळांची जबाबदारी असेल. असे सूत्रांकडून सांगण्यात आले.                                     

विधिमंडळ आवारातील सुरक्षा सांभाळणारे पोलीस असतात. परंतु, खाकी वर्दी ऐवजी निळ्या पोशाखात ते कर्तव्य करत असतात. एखाद्या मंत्री व आमदाराला पोलीस संरक्षण असले तरी विधिमंडळ परिसरात त्या सुरक्षा रक्षकाना प्रवेश देताना शस्त्र घेऊन प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे  साध्या वेशात या बंदोबस्तावरील पोलीस आवारात दिसतात.

70 वर्षीय भुजबळ हे आता कोणतेही सुरक्षेचे कडे तोडून जाऊ शकत नाहीत याची कल्पना सुरक्षा यंत्रणेला आहे. लढवय्या स्वभावाचे असलेल्या भुजबळ यांनी 1985 साली मुंबईचे महापौर असताना वेष बदलून सीमा प्रश्नाच्या लढ्यासाठी कर्नाटक राज्यात प्रवेश केला होता. त्यांना तेथे अटक झाली होती.  हा त्यांचा पूर्वइतिहास तपास यंत्रणेला माहीत आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा भुजबळांच्या मतदान प्रक्रियेदरम्यान एक टक्काही उणीव राहू नये म्हणून विशेष काळजी घेत असल्याचे समजते.

यापूर्वी आमदारांना पुरविण्यात येत असलेल्या खाजगी सुरक्षा रक्षक आणि पोलीस बंदोबस्त वरील कर्मचारी यावरून पेच प्रसंग आले होते. नारायण राणे हे 1990 मध्ये मालवण मतदारसंघातून निवडून आले होते. त्यावेळी त्यांच्याभोवती सुरक्षेचे कडे होते विधिमंडळ परिसरात प्रवेश करताना राणे यांच्या भोवती असलेल्या सुरक्षा रक्षकांना पिस्तुलासह अन्य अग्निशस्त्रे बाहेर ठेवावी लागली होती. तसेच अरुण गवळी याने आमदार झाल्यानंतर पोलिस संरक्षण मिळावे यासाठी अर्ज विनंत्या केल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने ही विनंती नाकारली होती.

विधिमंडळ परीसरातील सुरक्षेचे नियम पाळून सर्व लोकप्रतिनिधींना प्रवेश मिळतो. एरव्ही राष्ट्रपती निवडणूक पार पडत असली तर सुरक्षा यंत्रणेकडे विशेष लक्ष गेले नसते. परंतु, भुजबळांच्या मतदानामुळे विधिमंडळ सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जात असल्याचे समजते.

संबंधित लेख