Preetam Munde Meets Sexual Abused Victims Family | Sarkarnama

हिंजवडीतील पिडित मुलींच्या कुटूंबियांची प्रितम मुंडेंनी घेतली भेट 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

कासारसाई,हिंजवडी (पुणे) येथे नुकत्याच झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील ऊसतोड कामगारांच्या दोन मुलींच्या कुटुंबियांची बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांनी आज भेट घेऊन त्यांना धीर दिला

पिंपरी : कासारसाई,हिंजवडी (पुणे) येथे नुकत्याच झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील ऊसतोड कामगारांच्या दोन मुलींच्या कुटुंबियांची बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांनी आज भेट घेऊन त्यांना धीर दिला. 'ताई, तुमच्या भेाटीमुळे आम्हाला खरा आधार मिळाला आहे, आता तुम्हीच आमच्या माय-बाप आहात, अशा शब्दांत पीडितेच्या पित्याने आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. 

दरम्यान, पीडितेच्या कुटूंबियांना शासकीय सहाय्य करण्याबरोबरच या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खा.मुंडे यांनी सांगितले. राज्याच्या महिला बालविकास मंत्री व प्रितम यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांनी बीड व नगर येथील या ऊसतोड कामगारांच्या मुलींवर झालेल्या या अत्याचाराची गंभीर दखल घेतली आहे. पीडितेच्या कुटूंबियांची भेट घेण्यासाठी त्यांनी केलेल्या सूचनेनुसार खासदार मुंडे यांनी आज हिंजवडी परिसरात राहणा-या 'त्या' पीडितेच्या आई वडिलांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला. 

झालेली घटना मन सुन्न करणारी आणि संतापजनक आहे. 'तुम्ही काळजी करू नका, पंकजा मुंडे आणि राज्यसरकार तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी जलदगती न्यायालयातून प्रकरण चालविण्यासाठी आपण आग्रह धरू, अशा शब्दांत त्यांनी धीर दिला. पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्याकडूनही त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली. 

या घटनेसंदर्भात पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याशी खासदार मुंडे यांनी यावेळी दूरध्वनीवरून चर्चा केली. घटनेतील आरोपींना कोणत्याही परिस्थितीत कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांना जामीन मिळता कामा  नये असे त्यांनी आयुक्तांना सांगितले. ही घटना अतिशय संवेदनशील आहे, त्यामुळे त्याचे भांडवल करू नका अथवा याबाबत सोशल मिडियामध्ये पसरविल्या जाणा-या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन त्यांनी केले. पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शैला मोळक, तळेगांवचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, नगरसेविका योगिता नागरगोजे, प्रियांका बारसे, केशव घोळवे आदी यावेळी खासदार मुंडेबरोबर होते.

संबंधित लेख