Pravin darekar -Prakash Surve distributing sugar to voters | Sarkarnama

प्रकाश सुर्वे -प्रवीण दरेकर या आमदारांचा मतदारांत साखरपेरणीचा फंडा  !

कृष्णा जोशी 
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

मागठाण्यातील कट्टर प्रतिस्पर्धी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे (दादा) आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर (भाऊ) यांनाही दिवाळीनिमित्त त्याचा प्रत्यय येतो आहे.

दहिसर : साखरेचे खाणार त्याला देव देणार, अशी आपल्याकडे म्हण आहे. मागठाण्यातील कट्टर प्रतिस्पर्धी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे (दादा) आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर (भाऊ) यांनाही दिवाळीनिमित्त त्याचा प्रत्यय येतो आहे. नागरिकांना दिवाळीनिमित्त साखरवाटप करून त्यांनी त्यांचे तोंड गोड केले आहे. आगामी निवडणुकीत आपल्यावर मतांचा वर्षाव होवो अशीच प्रार्थना त्यांनी देवाकडे केली असणार, अशी प्रतिक्रिया मात्र नागरिक व्यक्त करीत आहेत.

भाजपचे वजनदार नेते आणि मुंबई जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी एकाच वेळी शेजारशेजारच्या शिवसेनेच्या दोघा आमदारांविरोधात शड्डू ठोकला आहे. दहिसर मतदारसंघात त्यांचे भाऊ प्रकाश दरेकर, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांचे प्रचंड वर्चस्व मोडून काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रवीण दरेकर मागठाणे मतदारसंघ आपल्या अमलाखाली आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अर्थात, स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनीही मतदारसंघावर मजबूत पकड ठेवली आहे.

 मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी दोघांतर्फे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. धार्मिक स्थळांच्या सहली, स्वच्छता मोहिमा, साखरवाटप आदी उपक्रम राबवण्यात दोघे नेते आघाडीवर आहेत. मतदारांना मात्र त्यामुळे चांगलाच फायदा होत आहे.

यंदाच्या दिवाळीत नागरिकांचे तोंड गोड करण्यासाठी मागठाण्यात आमदार प्रकाश सुर्वे यांनी प्रथम पाच रुपयांत दोन किलो साखर वाटण्याचा कार्यक्रम केला. त्यांनी त्यासाठी दोन ट्रक भरून 40 टन साखर आणली होती. पाच रुपयांचा विनियोगही गरजूंच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले. सुर्वे यांच्या उपक्रमानंतर आपणही कुठे मागे पडू नये म्हणून प्रवीण दरेकर यांनीही नागरिकांना दोन किलो साखर विनामूल्य दिली. दादा-भाऊंच्या स्पर्धेत दिवाळी गोड झाल्याने रहिवासी मात्र खूश आहेत. 
 

संबंधित लेख