युतीच्या चर्चेने मुंबईत प्रवीण दरेकरांसह चौघांच्या पोटात गोळा

युतीच्या चर्चेने मुंबईत प्रवीण दरेकरांसह चौघांच्या पोटात गोळा

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस "मातोश्री'पर्यंत पोहोचल्यामुळे आमदारकीसाठी आपले पक्ष सोडून भाजपमध्ये आलेल्या मुंबईतील चौघांची कोंडी झाली आहे. लोकसभेसाठी युती झाली आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकली; तर या चौघांनाही उमेदवारी मिळणार नाही, असे मानले जात आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत मागाठाणे मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपने त्यांना विधान परिषदेवर पाठवले. मागाठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे प्रकाश सुर्वे निवडून आले आहेत. त्यामुळे युती कायम राहिल्यास ही जागा भाजपला मिळणे अवघड आहे. परिणामी दरेकर यांना विधान परिषदेतच राहण्याखेरीस पर्याय नाही. तशीच अवस्था मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे यांची आहे. त्यांनी विक्रोळी विधानसभा मतदारसंघावर नजर ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेथील विद्यमान आमदार शिवसेनेचेच आहेत. त्यामुळे ही जागाही भाजपला मिळणार नाही.

महापालिका निवडणुकीत पत्नीला उमेदवारी मिळत नसल्यामुळे शिवसेनेचे परळ येथील माजी नगरसेवक नाना आंबोले हेही भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यांना शिवडी मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी देण्याचा विचार भाजपने केला होता. तेथेही शिवसेनेचेच आमदार असल्यामुळे आंबोले यांची अडचण झाली आहे.

माहीम मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गंभीर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांची कन्या शीतल गंभीर या भाजपच्या नगरसेविका आहेत. माहीममधून त्या विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तेथील आमदारही शिवसेनेचे असल्यामुळे त्यांनाही नगरसेवकपदावरच समाधान मानावे लागणार आहे.
 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com