prashant thakur | Sarkarnama

पनवेलमध्ये "कमळ' फुलल्याने प्रशांत ठाकुरांचा मंत्रिमंडळ प्रवेश सुकर

संदीप खांडगेपाटील
शुक्रवार, 26 मे 2017

मुंबई : पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतमोजणीनंतर कमळ फुलल्याने या विजयाचे "किंगमेकर' ठरलेले पनवेलचे स्थानिक भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांचा आता मंत्रिमंडळ प्रवेश सुकर मानला जात आहे.

मुंबई-ठाण्यात-कल्याणात धनुष्यबाण आणि लगतच्या नवी मुंबईत घड्याळाची टिकटिक सुरू असतानाच पहिली महापालिका असलेल्या पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकुरांच्या माध्यमातून कमळ फुलल्याने त्याची बक्षिसी म्हणून लवकरच मंत्रिमंडळ विस्तारात प्रशांत ठाकुरांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई : पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतमोजणीनंतर कमळ फुलल्याने या विजयाचे "किंगमेकर' ठरलेले पनवेलचे स्थानिक भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांचा आता मंत्रिमंडळ प्रवेश सुकर मानला जात आहे.

मुंबई-ठाण्यात-कल्याणात धनुष्यबाण आणि लगतच्या नवी मुंबईत घड्याळाची टिकटिक सुरू असतानाच पहिली महापालिका असलेल्या पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकुरांच्या माध्यमातून कमळ फुलल्याने त्याची बक्षिसी म्हणून लवकरच मंत्रिमंडळ विस्तारात प्रशांत ठाकुरांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे. 

निवडणुका जाहीर झाल्यापासून ते मतदान झाल्यावरही भाजप आणि शेकाप यांच्यात सत्तेसाठी अटीतटीची लढत होईल असेच राजकीय समीक्षकांचे तसेच सट्टेबाजारातील सटोडियांचेही म्हणणे होते. सट्टेबाजाराचा कलही शेकापच्या बाजूने अधिक होता. परंतु शुक्रवारी मतमोजणी सुरू होताच पनवेलकरांनी आपला कौल भाजपच्या पर्यायाने माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकुरांच्या बाजूने दिल्याचे स्पष्ट झाले.

78 जागा असलेल्या महापालिकेत भाजपने 50 जागांच्या आसपास मुसंडी मारल्याने शेकापसह अन्य पक्षांचा ठाकूर पिता-पुत्रांनी पालापाचोळा केल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले आहे. 

भाजपला महापालिकेत दोन तृतीयांशच्या जवळपास जागा मिळाल्याने पहिल्यावाहिल्या महापालिकेचा गाडा हाकण्यास पुढील पाच वर्षे फारसे राजकीय अडथळे येणार नाहीत. शेकापने वीसपेक्षा अधिक जागांवर मुसंडी मारल्याने पनवेलकरांच्या मनात अद्यापि अन्य पक्षांच्या तुलनेत शेकापला अधिक पसंती असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे,एमआयएमसह अन्य पक्षांचा पनवेलकरांनी गांभीर्याने विचारही केला नसल्याचे निवडणूक निकालात स्पष्ट झाले आहे. खासदार शिवसेनेचा असताना व लगतच्या उरण मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असतानाही तसेच प्रचारादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची जाहीर सभा, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा रोड शो या पार्श्‍वभूमीवर पनवेल महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा झालेला दारुण पराभव हा शिवसेनेसाठी नामुष्कीची बाब ठरणारा आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही येथे मतदारांनी स्पष्टपणे झिडकारल्याने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या नेतृत्वाच्या रायगड जिल्ह्यात त्यांच्याच होमपीचवर मर्यादा स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे. भाजपचा विजय हा खऱ्या अर्थाने माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर या पितापुत्रांच्या रणनीतीचा विजय मानला जात आहे.

या निवडणुकीत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पनवेलमध्ये तळ ठोकला होता. मुख्यमंत्री फडणवीसांची सभा झाली. खासदार प्रीतम मुंडे आणि जलसंधारण मंत्री राम शिंदेही भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते. पण भाजपने या निवडणुकीची सर्व सूत्रे ठाकूर पिता-पुत्रांच्या स्वाधीन केली होती.

उमेदवार निवडीपासून प्रचाराच्या रूपरेषा ठरवेपर्यत ठाकूर पितापुत्रच सबकुछ ठेवण्याचा निर्णय भाजपने घेतला होता. अर्थात रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांनी विश्‍वास सार्थ ठरविला. भाजपने दोन तृतीयांशच्या जवळपास नगरसेवक निवडून आणत पनवेल महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविला. 
हा पराभव खऱ्या अर्थाने शेकापच्या जिव्हारी लागण्यासारखा आहे.

या निवडणुकीवर माजी आमदार आणि शेकापचे येथील सर्वेसर्वा विवेक पाटलांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती. निवडणुकीत जोडीला शेकापने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसही घेतली होती. बहुमताला काही जागा कमी पडल्यास कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची मदत होईल असा अंदाजही शेकापवाल्यांनी बांधला होता.

भाजपच्या तुलनेत शेकाप-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाआघाडी वरकरणी प्रभावी वाटत होती, पण कागदावरची समीकरणे मतदारांपर्यंत परिणामी मतपेटीपर्यत प्रभावीपणे न पोहोचल्याने शेकापला आता पाच वर्षे विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. 

पनवेल महापालिका शहरी आणि ग्रामीण भागात मोडत आहे. परंतु शहरी आणि ग्रामीण दोन्ही मतदारांनी भाजपला भरभरून मतदान केल्याने पनवेल विधानसभा मतदारसंघापाठोपाठ पनवेल महापालिकादेखील भाजपचा बालेकिल्ला बनल्याचे निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले आहे. नवी मुंबई नाईक पिता-पुत्रांची तसेच पनवेल आता ठाकूर पिता-पुत्रांची असे येथील राजकारणात स्पष्ट झाले आहे. 

संबंधित लेख