Is Prashant Kishor is trying to bowl googly to Narendra Modi ? | Sarkarnama

'आधुनिक चाणक्‍य' प्रशांत किशोर नरेंद्र मोदींना गुगली टाकणार काय ? 

अनंत बागाईतकर
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

संयुक्त जनता दल, शिवसेना, अकाली दल, अण्णा द्रमुक, तेलंगण राष्ट्रसमिती, वायएसआर कॉंग्रेस, बिजू जनता दल यांचा गट स्थापन करायचा. या गटाला शंभरच्या आसपास जागा मिळाल्यास या गटातर्फे नितीशकुमार यांच्यासारख्या नेत्याचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे करायचे !

नवी दिल्ली : प्रशांत किशोर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजपचे स्ट्रॅटेजिस्ट म्हणून  उदयास आले . मात्र २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर भाजपला हवेतसे वाकवून घेण्यासाठी भाजपच्या मित्र पक्षांची एकजूट करण्याच्या हालचाली प्रशांत किशोर यांनी चालवल्या असल्याची राजधानीत चर्चा आहे .

त्यामुळे  प्रशांत किशोर यावेळी  नरेंद्र मोदी यांना गुगली टाकणार काय याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे . 

भाजपने मात्र त्यांच्या वर्तमान आघाडीतील मित्रपक्षांबरोबर जागावाटपाचे समझोते करून आघाडी कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी भाजप आघाडीत काही वेगळ्या हालचालीही सुरू आहेत. संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष, निवडणूक व्यवस्थापनशास्त्रातील तज्ज्ञ किंवा 'आधुनिक चाणक्‍य' म्हणून प्रसिद्धी मिळालेले प्रशांत किशोर ऊर्फ पीके यांनी वेगळी मोहीम सुरू केलेली आहे. 

त्यांच्या या मोहिमेत भाजपबरोबर असलेल्या मित्रपक्षांची एक उपआघाडी किंवा गट स्थापन करण्याची योजना आहे. त्यांनी यासंदर्भात अकाली दल, शिवसेना या सर्व घटक पक्षांशी चर्चा केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आगामी निवडणुकीत भाजपच्या किमान 80 ते 90 जागा कमी होतील, असा अंदाज प्रशांत किशोर यांच्यातर्फे वर्तविला जात असल्याचे समजते. 

त्यांच्या नव-सिद्धांतानुसार संयुक्त जनता दल, शिवसेना, अकाली दल, अण्णा द्रमुक, तेलंगण राष्ट्रसमिती, वायएसआर कॉंग्रेस, बिजू जनता दल यांचा गट स्थापन करायचा. या गटाला शंभरच्या आसपास जागा मिळाल्यास या गटातर्फे नितीशकुमार यांच्यासारख्या नेत्याचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे करायचे किंवा या गटासाठी भाजपकडून जास्तीत जास्त राजकीय लाभ उठविण्यासाठी 'बार्गेनिंग पॉवर' म्हणजेच 'दबाव गट' स्थापन करावयाचा. केवळ सैद्धांतिक पातळीवरील या पुस्तकी कल्पनेचा पाठपुरावा 'पीके' करीत आहेत. यामध्येदेखील सुप्त असा भाजपविरोध आणि महानायक-विरोध दडलेला आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीला समांतर अशा या हालचाली सुरू झाल्या आहेत.

वरील राजकीय शक्‍यता विचारात घेता निवडणुकीपूर्वीचे आणि निकालांनंतरचे राजकीय मुद्दे बदलू शकतात आणि त्यानुसार राजकीय समीकरणेही बदलू शकतात. अतिशय तरल राजकीय परिस्थितीच्या दिशेने भारतीय राजकारणाची वाटचाल सुरू आहे. विविध तज्ज्ञांनी वर्तमान स्थितीच्या आधारे व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आगामी निवडणुकीत भाजपच्या संख्याबळात घट होण्याची शक्‍यता आहे. निश्‍चित किती संख्या कमी होईल याबाबत वेगवेगळे अंदाज आहेत.

 परंतु, प्रामुख्याने हिंदीभाषक प्रदेशातच भाजपच्या जागा घटणार आहेत आणि ती देशाच्या अन्य राज्यांतून भरून काढण्याची धडपड पक्षातर्फे सुरू आहे. म्हणजेच ही तज्ज्ञ मंडळी भाजपचे त्यांच्या मित्रपक्षांवरील परावलंबित्व वाढण्याची शक्‍यता सूचित करीत आहेत.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख