prashant gadakh helps woman | Sarkarnama

सीताबाईंच्या मदतीला धावला "यशवंत'चा लवाजमा! : प्रशांत गडाख यांचा पुढाकार

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 16 मे 2019

नगर : कापूरवाडी (ता. नगर) येथील दत्तवाडी परिसरातील सीताबाई गंगा कराळे या निराधार वृद्धेचा, आधीच मोडका-तोडका असलेला संसार आगीत बेचिराख झाल्याचे वृत्त "ई-सकाळ'मध्ये वाचल्यानंतर सोनई (ता. नेवासे) येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाचे संस्थापक प्रशांत पाटील गडाख यांनी तत्काळ मदतीचा निर्णय घेतला. प्रतिष्ठानाचे पदाधिकारी व सदस्यांना त्यांनी तातडीने तेथे पाठवून मदतीच्या सूचना केल्या. त्यानुसार कार्यकर्त्यांनी आजच दुपारी कापूरवाडी येथे सीताबाई यांच्या नव्या घराच्या उभारणीचे काम सुरू केले.

सीताबाईंचे घर दोन दिवसांत तयार होईल. त्यानंतर लगेचच "यशवंत'च्या पुढाकाराने सीताबाई नव्या घरात संसार थाटणार आहेत. साखरझोपेत असतानाच आज सकाळी पावणेसातच्या सुमारास सीताबाई यांच्या झोपडीवजा छपराच्या घरातून धूर बाहेर येत असल्याचे शेजारी राहणाऱ्या विठाबाई केशव कराळे यांना दिसले. त्यांनी तातडीने मुलगा जालिंदर याच्या मदतीने सीताबाईंना छपरातून बाहेर काढले. आग कशाने लागली, हे समजण्यापूर्वीच आगीने रौद्र रूप धारण केले. आसपासची मंडळी आग विझविण्याच्या प्रयत्नात असतानाच छपरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आसपासच्या घरांच्या खिडक्‍यांची तावदानेही निखळली. काही घरांना हादरे बसले.

भाजीपाला विकून, अहोरात्र कष्ट करून उभारलेल्या संसाराची राखरांगोळी स्वतःच्या डोळ्यांसमोरच सीताबाईंना पाहावी लागली. जालिंदर कराळे यांनी पोलिस व महसूल यंत्रणेला खबर दिली. या दोन्ही यंत्रणांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पाहणी करून पुढील कार्यवाही केली. सीताबाई यांचे गॅसग्राहक कार्ड व बॅंकेचे पासबुकही जळून खाक झाले. भाजीपाला विक्रीच्या व्यवसायासाठी जमा केलेली पुंजीही आगीच्या खाईत सापडली. अंगावरची साडी, हीच सध्या सीताबाईंची मालमत्ता आहे.

भाजीखरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी वापरण्यात येत असलेला सीताबाईंचा मोबाईलही आगीत गेला. "सकाळ'चे कार्यकारी संपादक ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांनी सीताबाई यांना "सकाळ'तर्फे मोबाईल व दोन साड्या तातडीने पाठवून धीर दिला. 

सीताबाई यांच्या संसाराची राखरांगोळी झाल्याचे वृत्त काही मिनिटांतच "ई-सकाळ'वर झळकले. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी ते वाचले. त्यांनी तत्काळ सीताबाईंना घर व संसारोपयोगी साहित्याची मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाच्या "टीम'ने कापूरवाडीत जाऊन मदतकार्य सुरू केले. 

मदत नव्हे, कर्तव्यभावना : गडाख 

मातेसमान असलेल्या सीताबाईंची करुण कहाणी "ई-सकाळ'ने सर्वप्रथम मांडली. त्याबद्दल "सकाळ'चे अभिनंदन! सीताबाईंच्या घराच्या जळिताची घटना हृदयद्रावक आहे. दैव बलवत्तर म्हणून त्या या भयाण संकटातून वाचल्या. बातमी वाचताच सीताबाईंना मदत करण्याचा निर्णय घेतला व अंमलबजावणीही सुरू केली. सीताबाईंना ही मदत नसून, आमची कर्तव्यभावना आहे, असे यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी "सकाळ'ला सांगितले.

संबंधित लेख