प्रसन्न डोके यांचा शिवसेनेच्या जुन्नर तालुका समन्वयक पदाचा राजीनामा

प्रसन्न डोके यांचा शिवसेनेच्या जुन्नर तालुका समन्वयक पदाचा राजीनामा

आळेफाटा : शिवसेनेचे जुन्नर तालुका समन्वयक व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न डोके यांनी आज (ता.१५) शिवसेना तालुका समन्वयक पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. दरम्यान येत्या आठ दिवसांत जेष्ठ शिवसेना नेते तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तरी ते शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या आशा बुचके यांची साथ देण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

जुन्नर तालुक्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या पदाला मी न्याय देऊ शकत नाही त्यामुळे मी या पदाचा राजीनामा दिला असून मला या पदापासून कार्यमुक्त करावे असे त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून ते शिवसेनेचे जुन्नर तालुका समन्वयक म्हणून कार्यरत होते. दरम्यान जुन्नर तालुक्यात शिवसेनेचे कुशल संघटक व राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे प्रसन्न डोके यांनी, शिवसेना जुन्नर तालुका समन्वयकपदाचा राजीनामा शिवसेनेचे पुणे जिल्हा समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांच्याकडे पाठविला आहे. तसेच या राजीनाम्याची प्रत त्यांनी माहितीसाठी माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील व शिवसेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर (माऊली) खंडागळे यांनाही पाठवली आहे.

गेल्या सुमारे तीस वर्षांपासून ते शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. सन १९८८ साली शिवसेनेचे आळे गावचे शाखाप्रमुख म्हणून, तर सन १९९२ ला शिवसेना विभागप्रमुख म्हणून त्यांची निवड झाली होती. तर गेल्या १९९७ साली शिवसेनेकडून पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून ते विजयी झाले होते. सन २००६ साली विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांची निवड झाली होती, मात्र वर्षभरातच वयक्तिक कारणास्तव त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान गेल्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे बंधू माजी पंचायत समिती सदस्य नेताजी डोके यांनी भाजपच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवल्याने, त्यांनी भावासाठी तालुक्यातील भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यानंतर भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेली असतानाही त्यांनी हे पद नाकारून ते पुन्हा शिवसेनेत सक्रिय झाले होते.

गेल्या दोन वर्षांपूर्वी शिवसेनेचे पुणे जिल्हा समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांच्या माध्यमातून, त्यांची जुन्नर तालुका शिवसेना समन्वयकपदी निवड झाली तेंव्हापासून ते शिवसेनेचे तालुका समन्वयक म्हणून कार्यरत होते. दरम्यान माजी पंचायत समिती सदस्य नेताजी डोके यांनी, लोकसभा निवडणुकीपूर्वी आमदार शरद सोनवणे यांच्या समवेत शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्या नयनाताई नेताजी डोके याही शिवसेनेत कार्यरत आहेत. दरम्यान प्रसन्न डोके यांनी शिवसेना तालुका समन्वयक पदाचा राजीनामा दिल्याने, त्यांची पुढील राजकीय दिशा काय असेल याविषयी विविध तर्कवितर्क सुरु झाले आहेत. दरम्यान आगामी काळात ते शिवसेनेतच सक्रिय राहणार की वेगळा निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com