भाजपचा राणेंवर भरोसा नाही...प्रसाद लाड तळकोकणात तळ ठोकून

भाजपचा राणेंवर भरोसा नाही...प्रसाद लाड तळकोकणात तळ ठोकून

रत्नागिरी : रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी गेले काही महिने तळ ठोकला आहे. पक्ष वाढविण्याची जबाबदारी श्री. लाड यांच्यावर देण्यात आली आहे. त्यादृष्टीने त्यानी पावले उचलली आहेत; मात्र आगामी निवडणुका स्वबळावर लढविल्या तर शिवसेनेची अभेद्य फळी फोडण्याचे मोठे आव्हान लाड यांच्यासह भाजपपुढे आहे. त्यासाठी भाजपची मदार आयारामांवरच राहणार आहे.

भाजपचे प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीच्या स्वतंत्र बैठका घेऊन ‘संयुक्त गाभा समिती’ स्थापन केली; मात्र स्वबळावर लढण्याची वेळ आली तर या दोन जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात भाजप पदरी अपयश आहे. त्याची भरपाई करण्यासाठी गेले काही महिने श्री. लाड तळ ठोकून आहेत.

त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मातब्बर नेते नारायण राणे हे भाजपच्या पाठिंब्यावर खासदार आहेत. त्यांचा दोन्ही जिल्ह्यांत प्रभाव आहे. त्यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचा विस्तार करण्याचा मनोदय ते बोलून दाखवतात. त्यामुळे त्यांच्यावर फार अवलंबून न राहता भाजपने स्वतंत्रपणे आपले नियोजन सुरू केले आहे. 

भाजप वाढविण्यासाठी जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे. त्यानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दौरे करण्याचे काम सुरु केल्याचे लाड यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातील पाच पैकी चार जागा हमखास जिंकू, असा दावाही लाड यांनी अनौपचारिक चर्चेत केला आहे; मात्र मतदारसंघात फारशी ताकद नसतानाही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्याचा चमत्कार करण्याची क्षमता असणारे भाजपचे उमेदवार किती, हा प्रश्नच आहे.

अन्य पक्षांतील सक्षम उमदेवारांना आणून स्वप्नपूर्ती करणे हाच एकमेव उपाय आहे. लोकसभा निवडणुकीत युती होईल, अशी आशा आहे. तसे झाले तर सेनेचे विद्यमान खासदार राऊत यांचा विजय सुकर होईल. पण भाजपने स्वतंत्र उमेदवार दिले तर त्याना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे.

विधानसभेसाठी पाच पैकी दापोली, गुहागर, चिपळूण या मतदारसंघात शिवसेना व राष्ट्रवादीकडून आतापासूनच तयारी सुरु झाली आहे; मात्र भाजपला उमेदवार शोधावा लागणार आहे. चिपळूणात बाळ माने यांच्यासह तुषार खेतल, सौ. सुरेखा खेराडे यांची नावे चर्चेत आहेत. उमेदवारीसाठी जोरदार चुरसही सुरु झाली आहे. गुहागरमध्ये माजी आमदार अ‍ॅड. विनय नातू यांच्या व्यतिरिक्त अन्य नाव आतातरी नाही. रत्नागिरीतून बाळ मानेंनी न उभे राहण्याचा निर्णय जाहीर केल्याने येथील जागा रिक्तच आहे.  राजापूरात मागीलवेळी संजय यादवराव यांना आणावे लागले होते. त्यामुळे भाजपला अन्य पक्षांवरच अवलंबून राहावे लागण्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com