प्रणब मुखर्जीं सारखे 'मास्टर' अजूनपर्यंत पाहिले नाही : पृथ्वीराज चव्हाण
मुंबई : "मी 'प्रणबदा: यांना 'मास्टर' ही पदवी देईन. त्यांच्याइतके प्रभावशाली व्यक्तिमत्व असणारे राष्ट्रपती मी तरी अजून पाहिले नाहीत, "असे भावोद्गार काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'सरकारनामा' शी बोलताना काढले.
मुंबई : "मी 'प्रणबदा: यांना 'मास्टर' ही पदवी देईन. त्यांच्याइतके प्रभावशाली व्यक्तिमत्व असणारे राष्ट्रपती मी तरी अजून पाहिले नाहीत, "असे भावोद्गार काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'सरकारनामा' शी बोलताना काढले.
येत्या 24 जुलै रोजी राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे येणाऱ्या आठवड्यात प्रणब मुखर्जी यांचा राष्ट्रपती म्हणून कार्यकाळ संपून कोविंद हे नव्या राष्ट्रपती पदी विराजमान होतील. आज 'सरकारनामा' ने पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रणब मुखर्जीं बाबत अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांच्याशी असलेल्या वैयक्तिक संबंधांबाबत ते बोलत होते.
" मुखर्जी यांनी त्यांच्या राजकारणातील प्रवास अनेक दिग्गज नेत्यांसोबत केला. इंदिरा गांधींच्या ते खास विश्वासातले. मुखर्जींनी त्यांच्या राजकारणातल्या कारकिर्दीत अनेकदा चढ-उतार पाहिले. अर्थात, हे प्रत्येक राजकारणी नेत्याच्या वाटेला येते. परंतु मुखर्जी कधीच डगमगले नाही. तेवढ्याच जोमाने त्यांनी कामाची सुरुवात केली. एकवेळ अशी आली की, त्यांची राजकीय कारकीर्द संपली असेच जवळजवळ निश्चित होते. परंतु त्यांनी आपला नवा पक्ष स्थापन करून पुन्हा जोमाने राजकारणात उतरले. 'सरव्हायव्हल स्किल' हा त्यांच्यातला विशेष गुण," असे चव्हाण म्हणाले.
" मुखर्जीं यांच्या सोबत 20 वर्षे काम केले. 1991 ते 2010 तर प्रत्यक्ष त्यांच्यासोबत काम केलेल्याचा अनुभव. फार शांत आणि विचारी स्वभावाचे आहेत मुखर्जी. असे असले तरीही आम्हा नेतेमंडळींची बैठक बसली की तासनतास ते गप्पा मारायचे. त्यांचा अभ्यास, विचार वाखाणण्याजोगा आहे. माझ्या राजकारणाच्या कारकिर्दीत मी खूप काही शिकलो त्यांच्याकडून. यापुढेही ते देशासाठी काम करत राहतील, अशी मला खात्री आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा. तसेच आम्ही यापुढेही असेच एकत्र काम करू, अशी मला आशा वाटते." अशा शब्दांत चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.