विरोधकांकडून मेहता यांचे आणखी तीन घोटाळे उघडकीस

विरोधकांकडून मेहता यांचे आणखी तीन घोटाळे उघडकीस

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सलग चौथ्या दिवशी विरोधकांकडून गृहनिर्माण मंत्र्यांचे आणखी तीन घोटाळे विरोधकांकडून उपस्थित करण्यात आले. तसेच या गृहनिर्माण मंत्र्यांच्या विरोधात रोज नवीन माहिती पुढे येत असल्याने मंत्र्यांना पदावरून दूर करून त्यांची चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. त्यामुळे मेहता यांच्या वरील दबाव वाढला आसून उद्या भाजपच्या राज्यप्रभारी सरोज पांडे राज्याच्या भेटीवर येणार आहेत. 

दरम्यान आज रात्री मेहता यांनी खुलासा केला आहे, दरम्यान तालिका अध्यक्षांनी त्यांना बोलण्याची परवानगी नाकारल्याने विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घालत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केल्याने विधानसभेचे कामकाज चारवेळा तहकूब करावे लागले. सकाळी आज विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. 

मात्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्ताव मांडायचा असल्याचे सांगत राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांच्याबाबत आणखी नवी माहिती उघडकीस आली असून मंत्री व त्यांचे कुटुंबिय साईनिधी प्रा.लि. कंपनीचे अतिरिक्त संचालक असून या कंपनीने घाटकोपर येथे खरेदी केलेल्या जागेवर दोन इमारती आहेत. या इमारतीत स्वत:च्या मुलाला आणि नातेवाईकाला बोगस भाडेकरून दाखवून त्यांना सदनिका दिल्या आहेत. तशी माहिती मिनिस्ट्री ऑफ कार्पोरेट अफेअर्सच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचबरोबर सम्यक दर्शन या घाटकोपर येथील इमारतीच्या विकासकाविरोधात दाखल करण्यात आलेल्या पोलिस तक्रारीत त्यांच्या पत्नीचे किशोरी प्रकाश महेता असे नाव आहे. 

मात्र त्यांनी त्यात बदल करून किशोर प्रकाश महेता असा नावात बदल केल्याचा आरोप करत याच भागातील संक्रमण शिबीराची आणि एसआरएची जागा एकत्रित करून विकासकाला अधिकचा फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक माहिती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर योगेश सागर यांनी आपल्याला फक्त मुद्दा मांडण्याची परवानगी दिली असता तुम्ही तर भाषणच करायला सुरुवात केल्याचे सांगत बोलण्यास परवानगी नाकारली. 

त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेला मुद्दा नविन असून त्यावर सरकारकडून निवेदन करावे अशी मागणी केली. तसेच सरकारकडून गृहनिर्माण मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरु असून हा योग्य प्रकार आहे का असा सवाल केला. यावर सांसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच भूमिका जाहीर केल्याचे सांगत चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात येणार असून त्यात तुम्हाला काय मांडायचे ते मांडा. मात्र आता प्रश्नोत्तराचा तास होवू द्या अशी सूचना विरोधकांना केली. तरीही विरोधकांकडून गोंधळ सुरुच राहीला. 

अध्यक्षांकडून कामकाज पुढे रेटत असल्याने विरोधकांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येत महेता यांच्या नावे असलेला फलक फडकावित गुंडा सरकार हाय हाय अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यातच सभागृहाचे कामकाज चारवेळा तहकूब करावे लागले. दरम्यानच्या काळात विरोधकांकडून गृहनिर्माण मंत्र्याचे नाव घेता त्यांना नोटीस दिलीय का ? असा सवाल तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी विरोधकांना विचारला. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भास्कर जाधव यांनी हा मुद्दा अध्यक्षांनी नव्हे तर सत्तारूढ बाकावरून उपस्थित करायचा असतो अशी आठवण करून दिली. 

त्यावर राज पुरोहीत यांनी हा मुद्दा उपस्थित करण्यापूर्वीच विखे-पाटील यांनी नवीन मुद्दे मांडताना गृहनिर्माण मंत्र्यांचे नाव घेतले नसून त्यांच्या पदाचा उल्लेख केल्याचे सांगत मोपलवार प्रमाणे गृहनिर्माण मंत्र्यांना पदावरून दूर सारून चौकशी करावी. तसेच त्यांना बडतर्फ करून त्यांचा आजच राजीनामा घ्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 

मेहतांकडून खुलासा 
आपला मुलगा हर्ष याचा कंपनीशी संबंध नाही. तसेच आपण मंत्रिपद स्वीकारताना आपण राजीनाम दिला होता.पत्नी किशोरी आणि आपली आई यांच्या नावे एक सदनिका आहे.तसेच आपल्या भावाचे नाव किशोर आहे. तो तिथे सध्या राहत आहे असे निवेदन मेहता यांनी सभागृहात आता केले. 
उद्या भाजपाच्या प्रभारी सरोज पांडे राज्याच्या दौर्यावर येणार आहेत.त्यामुळे मेहता यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला आहे. 

विखे पाटील यांनी केला कुटुंबावरच आरोप 
घाटकोपर येथील एस.आर.ए. प्रकल्पात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी भाडेकरूंऐवजी स्वतःचा मुलगा हर्ष याला अवैधरित्या सदनिका दिली तसेच पत्नी किशोरी हिचे नाव किशोर दाखवत गैरव्यवहार केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केला. सलग तिसऱ्या दिवशी मेहता यांच्यावरील आरोपाने सभागृहाचे कामकाज ठप्प झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि गणपतराव देशमुख यांच्या अभिष्टचिंतनापूर्वी आज या मागणीमुळे विधानसभेचे कामकाज सातत्याने बंद पडले. घाटकोपर पूर्वेतील सीटीएस 194 या क्रमांकाच्या भूखंडावर संक्रमण शिबीर असताना प्रत्यक्षात तिथे मेहता यांनी गैरव्यवहार केली. मंत्री होण्यापूर्वी ते संचालक असलेल्या कंपनीमार्फत गैरव्यवहार झाल्याचा आरोप ते करीत होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com