Prakash Jawdekar Nashik Program | Sarkarnama

...आणि प्रकाश जावडेकर नेत्यांवर संतापले

संपत देवगिरे
बुधवार, 7 जून 2017

शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त होता. काही गडबड होऊ नये यासाठी पन्नास ते साठ पोलिसही साध्या वेषात बसले होते. त्यामुळे कार्यक्रम संपल्यावर पोलिसांनी पत्रकारांना किती गर्दी होती? असा प्रश्न विचारला. त्यावर पत्रकार म्हणाले 450. पोलिस म्हणाले नाही हो फक्त 350.

नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्रिय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर काल दिवसभर नाशिकच्या दौ-यावर होते. भाजपकडे महापालिकेत 66 नगरसेवक, तीन आमदार दीड खासदार अशी पदे आहेत. मात्र, त्यांच्या मुख्य कार्यक्रमास अवघे साडे तीनशेची उपस्थिती होती. त्यामुळे जावडेकरांची चांगलीच निराशा झाली.  

जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करणा-या भाजपचे सतरा लाखांच्या नाशिक शहरात दोन लाख सदस्य असल्याचा प्रचार करण्याची एकही संधी स्थानिक नेते कधी सोडत नाहीत. महापालिकेत स्वबळावर सत्तेत आलेल्या भाजपचे 66 नगरसेवक आहेत. तीन आमदार, खासदार हरिश्चंद्र चव्हाण आणि राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे हे खासदार असलेल्या भाजपचे संख्याबळ निश्चितच वजनदार आहे. जावडेकर यांच्या कार्यक्रमाला मात्र खुद्द खासदार चव्हाणही अनुपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला तीन वर्षे झाल्याने त्याच्या प्रचाराचा मेळावा कालिदास कलामंदीरात झाला. त्याची तळमजल्यावरील आसन क्षमता साडे सातशे असतांना निम्मी आसने रिकामी होती. गंमत म्हणजे शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त होता. काही गडबड होऊ नये यासाठी पन्नास ते साठ पोलिसही साध्या वेषात बसले होते. त्यामुळे कार्यक्रम संपल्यावर पोलिसांनी पत्रकारांना किती गर्दी होती? असा प्रश्न विचारला. त्यावर पत्रकार म्हणाले 450. पोलिस म्हणाले नाही हो फक्त 350.

कार्यक्रम सुरु असतांना व्यासपीठावर बसलेल्या दहा मोठ्या नेत्यांनाही चुकल्यासारखे वाटत होते. सुरवातीला काही संप समर्थक शेतकरी त्यांना निवेदन देण्यासाठी आल्याने कार्यकर्ते व पोलिसही सर्तक होते. निवेदन देऊन शेतकरी निघुन गेल्यावर मात्र सारे काही शांत शांत झाले. त्यामुळे कार्यक्रम संपल्यावर काही पदाधिकारी जावडेकरांची स्तुती करु लागताच डोळे वटारून ते तडक गाडीत बसून संघाच्या निव़डक नेत्यांच्या बैठकीस निघून गेले. कार्यकर्त्यांतही अपराधीपणा होता. त्यामुळे जावडेकरांचा संताप पाहिलेल्यांसाठी तो चर्चेचा विषय ठरला.

संबंधित लेख