prakash ambedkar's descision analysis | Sarkarnama

प्रकाश आंबेडकरांचा पहिला वार 'राष्ट्रवादी- स्वाभिमानी' आघाडीवर!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 डिसेंबर 2018

काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी 'बुलडाणा' राजु शेट्टींचा स्वाभिमानी पक्षाला सोडू शकते, मग भारीप-वंचित बहुजन आघाडीला कां नाही, हा प्रश्न आगामी काळात उपस्थित होणार आहे. 

पुणे : भारीप आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला तीव्र विरोध आहे. काँग्रेस पक्ष जेवढा एमआयएमचा तिरस्कार करतो, तेवढा तिरस्कार प्रकाश आंबेडकर राष्ट्रवादीचा करतात. म्हणून आंबेडकरांनी आपला 'पहिला वार' राष्ट्रवादीवर केला आहे. मात्र यात राजु शेट्टींचा स्वाभिमानी पक्षच जबर जखमी होण्याची शक्यता आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी काल बुलडाणा लोकसभेसाठी उमेदवाराची घोषणा केली. त्यांच्या भारीपचे एकमेव आमदार बळीराम सिरस्कार यांना ते बुलडाण्याच्या रिंगणात उतरवणार आहेत. बळीराम सिरस्कार हे अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार आहेत. या विधानसभेचा बुलडाणा लोकसभेशी संबंध नसतानाही सिरस्कार यांना लढवले जाणार आहे. सिरस्कार हे माळी समाजाचे असल्याने, तेथील व्होटबँक समोर ठेवण्यात आली आहे. 

2014 च्या  विधानसभेची आकडेवारी पाहता बुलडाणा लोकलभेतील जळगाव जामोद आणि खामगाव विधानसभा मतदारसंघात भारीपचा प्रभाव आहे. सव्वा लाख मते भारीपकडे आहेत. गेल्या वर्षभरात भारीप- वंचित बहुजन आघाडीचे (एमआयएमसह) वाढलेले बळ पाहता आंबेडकरांना बुलडाण्यात अपेक्षा आहेत. विश्लेषणाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास भारीप- वंचित बहुजन आघाडीचे मतदान निश्चितपणे काँग्रेस आघाडीला धडकी भरविणारे असणार आहे. 

काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या वाटपात ही जागा राष्ट्रवादीकडे आहे. 2014 ला कृष्णराव इंगळे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. त्यांना दुसऱ्या क्रमांकाची 36 टक्के मिळाली, तेथुन शिवसेनेचे प्रतापराव जाधव खासदार झाले आहेत. यावेळी राष्ट्रवादी माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या उमेदवारीताठी आग्रही आहे. मात्र शिंगणे रिंगणात उतरण्याची शक्यता कमी आहे. कारण या जागेवर खासदार राजु शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाने दावा केला आहे. स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर यांच्यासाठी ही जागा शेट्टींनी प्रतिष्ठेची केली आहे. 

2014 ला झालेल्या महायुतीत शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाला हातकणंगले (कोल्हापूर- सांगली जिल्हा) आणि माढा (सोलापूर- सातारा जिल्हा) या दोन जागा दिल्या होत्या. हातकणंगलेत शेट्टी मोठ्या फरकाने जिंकले, तर माढ्यातील उमेदवार सदाभाऊ खोत (आज ते शेट्टींचे कट्टर विरोधक आहेत) फार कमी मताने हारले. माढ्यात काठावर जिंकलेली राष्ट्रवादी आजच्या परिस्थितीत प्रबळ आहे, तर हातकणंगल्यात निर्णायक आहे. राष्ट्रवादीने हातकणंगले मतदारसंघ शेट्टींना सोडून दिल्यात जमा आहे आणि माढा सोडण्याचा त्यांच्याकडे विषयच नाही. म्हणूनच शेट्टींनी तुपकरांसाठी बुलडाण्यात जोर लावला आहे. 

शेट्टी कोणत्याही परिस्थितीत घाट्याचा सौदा करणार नाहीत. काँग्रेस- राष्ट्रवादीने देवू केलेल्या एका जागेवर (हातकणंगले) गप्प बसणार नाहीत. शेट्टी दुसरी जागा मिळवू शकले नाहीत तर ते स्वत:ची खासदारकी वाचवण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीबरोबर गेले, अशी टीका ठरलेली आहे. त्यामुळे अशी टीका टाळण्यासाठीतरी शेट्टी दुसरी आणि तीही बुलडाण्याची जागा सोडवून घेतील, असे दिसते. परिणामी राष्ट्रवादी 'हमखास विजय मिळवून देणाऱ्या' माढ्याच्या बदल्यात 'कायम पडणारी' बुलडाण्याची जागा देईल, अशी सद्यस्थिती आहे. म्हणूनच भारीप-वंचित बहुजन आघाडीचा थेट उपद्रव काँग्रेस- राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने लढणाऱ्या शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाला होवू शकतो. 

गेल्या काही महिन्यांत, आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला मोठा प्रतिसाद मिळू लागल्यानंतर राजु शेट्टींनी प्रकाश आंबेडकरांची दोन-तीनदा भेट घेतली. या भेटीच्या निमित्ताने 'शेट्टी आंबेडकरांबरोबर जाणार' अशी हवा निर्माण करण्यात आली होती. मात्र तशी वस्तुस्थिती नव्हती. आंबेडकरांनी काँग्रेस- राष्ट्रवादीबरोबर यावे, यासाठी शेट्टी भेटत होते. 

महत्वाची बाब म्हणजे एमआयएमबाबत काँग्रेस- राष्ट्रवादीचे जे विचार आहेत, तेच विचार शेट्टींचे आहेत, ही बाब स्पष्ट झाली आहे. तसेच शेट्टी हे मनापासून काँग्रेस- राष्ट्रवादीसाठी काम करत असल्याची खात्री झाल्याने आंबेडकरांनी पहिला उमेदवार बुलडाण्याचा जाहीर केला असावा, असे मानले जात आहे.

 

 

संबंधित लेख