Prakash Ambedkar Wanted More Big Ground for Public Meeting | Sarkarnama

प्रकाश आंबेडकरांनी सभेसाठी अधिक मोठे मैदान पाहण्यास सांगितले होते-अमित भुईगळ 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

2 ऑक्‍टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांची संयुक्त प्रचंड जाहीर सभा औरंगाबादेत पार पडली. या सभेला झालेल्या गर्दीवरून सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी भारिपचे प्रदेश सरचिटणीस अमित भुईगळ आणि इतर पदाधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा होता. 

औरंगाबादः ''महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीची मोट बांधल्यानंतर या प्रयत्नाला जोरदार यश मिळणार, याचा अंदाज आमचे नेते अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना आला होता. बीडमध्ये झालेल्या अधिवेशनात त्यांनी औरंगाबादच्या मेळाव्याची घोषणा केली होती. यासाठी आतापर्यंत गर्दीचे विक्रम मोडणाऱ्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, आमखास मैदानापेक्षा मोठे मैदान निवडा अशा सूचना बाळासाहेबांनी दिल्या होत्या," अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश सरचिटणीस अमित भुईगळ यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना दिली. 

2 ऑक्‍टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांची संयुक्त प्रचंड जाहीर सभा औरंगाबादेत पार पडली. या सभेला झालेल्या गर्दीवरून सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी भारिपचे प्रदेश सरचिटणीस अमित भुईगळ आणि इतर पदाधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा होता. 

या संदर्भात बोलतांना अमित भुईगळ म्हणाले, ''एमआयएमने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्याआधी म्हणजे 1 ऑगस्टलाच ऑक्‍टोबरच्या मेळाव्यासाठी आम्ही जाबिंदा मैदान आरक्षित केले होते. मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, आमखास मैदानाचा देखील आम्ही विचार केला होता. पण या मैदानाच्या क्षमतेपेक्षा जास्त गर्दी मेळाव्याला होणार याचा अंदाज बाळासाहेबांना आला होता आणि म्हणूनच त्यांनी या दोन्ही मैदानापेक्षा मोठे मैदान पहा अशी सूचना मला दिली होती." 

''त्यानूसार बारा एकरमध्ये असलेल्या जाबिंदा मैदानाची आम्ही निवड केली. सभेला चार लाखाहून अधिक लोक येतील असा आमचा अंदाज होता. 3 लाख 20 हजार स्क्वेअर फुट एवढी ही जागा आहे. प्रत्येक व्यक्तीला बसण्यासाठी लागणारी जागा गृहित धरली तरी पावणे दोन लाखांची गर्दी या मैदानावर बसू शकते. प्रत्यक्षात सभेला अडीच लाखाहून अधिक लोक आले होते," असेही त्यांनी सांगितले. 

पुढील सभाही रेकॉर्ड मोडणाऱ्या ठरतील
औरंगाबादमधील बाळासाहेबांची सभा रेकॉडब्रेक झाली. आता 28 तारखेला नागपूरात या सभेचा रेकॉर्ड मोडला जाईल. त्यानंतर महाराष्ट्रात नाशिक, पुणे आणि मुंबईत देखील वंचित आघाडीच्या सभा होणार आहेत, या सगळ्या सभा आपलेच रेकॉर्ड मोडणाऱ्या ठरतील असा दावा देखील अमित भुईगळ यांनी केला. 

पश्‍चिममधून लढण्यास इच्छूक
वंचित बहुजन आघाडी व एमआयएमच्या संयुक्त जाहिर सभेसाठी पश्‍चिम मतदारसंघातील मैदानाची निवड करण्यामागे काही खास कारण होते का? संभाव्य उमेदवार म्हणून तुम्हाला प्रोजेक्‍ट करण्यासाठीच ही सभा होती का? या प्रश्‍नावर आपण पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची कबुली भुईगळ यांनी दिली. 

ते म्हणाले, ''पण तुर्तास हा विषय महत्वाचा नाही, निवडणुकीला अजून खूप अवकाश आहे. आधी लोकसभा आणि नंतर विधानसभेच्या निवडणुका होतील." मी इच्छुक असलो तरी बाळासाहेब माझ्यावर जी जबाबदारी सोपवतील ती मी सांभाळण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जाहीर सभेत महत्वाची घोषणा किंवा निर्णय जाहीर केला जाईल, अशी अपेक्षा होती, पण तसे काहीच घडले नाही. यावर "सगळेच पत्ते एकावेळी कसे उघडले जातील असे सांगत त्यांनी थोडे दिवस थांबा," असा सूचक इशारा देखील भुईगळ यांनी दिला. 

संबंधित लेख