Prakash Ambedkar eyeing Mali community votes | Sarkarnama

वंचित माळी समाजाची एल्गार परिषद : प्रकाश आंबेडकरांची नवी खेळी ?

अरूण जैन 
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

या परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी केवळ भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनाच निमंत्रित करण्यात आले आहे.

बुलडाणा :  लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय भागीदारी मिळावी, या मागणीसाठी माळी समाजाने येत्या 28 डिसेंबरला शेगावात एल्गार परिषदेचे आयोजन केले आहे.

या परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी केवळ भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनाच निमंत्रित करण्यात आले आहे.

त्यामुळे मराठा आरक्षणाच्या धर्तीवर माळी समाजाची मोट बांधून त्यांची राजकीय महत्वाकांक्षा जागृत करण्यासाठी बाळासाहेबांची ही राजकीय खेळी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बुलडाण्यात बुधवारी  वंचित माळी या बॅनरखाली समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीला भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनुने, अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र महाडोळे, बाळापूरचे भारिप-बमसंचे आमदार बळिराम सिरस्कार यांची उपस्थिती होती. या बैठकीत त्यांनी शेगाव येथे आयोजित एल्गार परिषदेची माहिती दिली.

वास्तविक पाहता बाळासाहेबांशी चार भिंतीत बोलून ही भूमिका मांडता आली असती. मात्र त्यासाठी स्वतंत्र एल्गार परिषद घेण्याचे प्रयोजन लक्षात येत नाही. शिवाय या परिषदेला एकट्या बाळासाहेबांनाच निमंत्रण का?

या प्रश्नावरून माळी समाजाची राजकिय महत्वाकांक्षा जागृत करून वंचित बहुजन आघाडीसोबत समाज जोडण्यासाठी बाळासाहेबांचीच खेळी असण्याची जास्त शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित लेख