मोदी दुसऱ्याला खायला लावून वाटा मागतात : प्रकाश आंबेडकर

नक्षलवाद्यांवर कारवाई केली जाते, मग सनातनवर का नाही? त्यांच्या घरात बॉम्ब कसे सापडतात असा सवाल उपस्थित करतांनाच सध्या देशाला बुडवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला.
मोदी दुसऱ्याला खायला लावून वाटा मागतात : प्रकाश आंबेडकर

औरंगाबादः देशाच्या पंतप्रधानाची प्रतिमा स्वच्छ आहे, आनंद आहे, त्यांनी ना खाऊगां, ना खाने दुंगाचा नारा दिला होता. प्रत्यक्षात मात्र उलट आहे. ते स्वता खात नाहीत, दुसऱ्याला खायला लावतात आणि वाटा मागतात असा घणाघाती आरोप भारिप बहुजन व वंचित आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादेत केला. 

रिलायन्स कंपनीची तिजोरी भरून दिवाळखोरी रोखण्यासाठीच देशात पेट्रोलचे भाव वाढवण्यात आल्याची टिका देखील त्यांनी केली. वंचित बहुजनांच्या लढ्याला आपण सुरूवात केली आहे, मतदानापर्यंत हा जोष कायम ठेवा असे आवाहन देखील आंबेडकरांनी उपस्थितांना केले. 

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची संयुक्त जाहीर सभा आज (ता. 2) दुपारी औरंगाबादेत प्रचंड गर्दीत पार पडली. मराठवाडा व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक या सभेला आले होते. रखरखत्या उन्हात दुपारी अकरा वाजेपासून बसलेल्या गर्दीला संबोधित करतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले, सध्या देशात भयानक परिस्थीती निर्माण झाली आहे. कुणी मुसलमानांना देश सोडायला सांगतय, पण हे सांगणारे तुम्ही कोण? 2019 मध्ये आम्हीच तुम्हाला आपटल्याशिवाय राहणार नाही. 

व्ही.पी.सिंग यांनी 90 साली मंडल आयोगाची स्थापना केली आणि ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले. पण आता ओबीसी उमेदवार निवडूणच येऊ नये असे प्रयत्न केले जातात. सत्ताधाऱ्यांनी प्रभाग पध्दत अमंलात आणली आहे. विधानसभा, लोकसभा निवडणूकीत असेच झाले तर आपल्याला संधीच मिळणार नाही. तेव्हा निवडणूकीची पध्दत बदलणाऱ्यांनाच बदलायच अशी खूनगाठ मनाशी बांधा असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले. 

शेतकऱ्यांवर टिका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यावरही प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यानी रडवले आहे. दानवे अमेरिकेत ट्रम्प सरकार शेतकऱ्यांना किती सबसिडी देते हे तुम्हाला माहित आहे का? सरकारकडून जी काही मदत शेतकऱ्यांना दिली जाते ती तुमच्या खिशातून किंवा मालमत्तेतून दिली जात नाही. 

तेव्हा मालका सारखे वागू नका, नाही तर तुम्हाला सालगडी म्हणून ठेवू . जनतेने तुम्हाला पाच वर्षासाठी सत्ता दिली आहे. राजेशाही आता संपली आहे, तेव्हा राजासारखे वागू नका नसता जेल मध्ये टाकू असा गर्भीत इशारा देतांनाच पाच वर्षांनी तुमच लायसन्स रिन्यू करायचं की नाही हे आम्ही ठरवणार आहोत असा दम देखील आंबेडकरांनी दिला. 

राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर टिका करतांना प्रकाश आंबेडकरांनी मॉब लिंचिंगचा मुद्दा उपस्थित केला. आरएसएस म्हणते आम्ही तुम्हाला देशात राहू देणार नाही. अमेरिकतून ट्रम्प भारतीयांना हाकलतायेत. मग भाजपला मदत करणाऱ्या ट्रम्प यांना देशात येऊ देणार नाही अशी भूमिका आम्ही घ्यायची का? 

द्वेषाच्या राजकारणाला मूठमाती द्या असे आवाहन करतांनाच गाईचे मांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून कुणाची हत्या करणे असे प्रकार महाराष्ट्रात खपवून घेणार नाही. कायद्याने व्यवसाय करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, कुणालाही कायदा हातात घेऊ देऊ नका असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com