Prakash Ambedkar - Asaduddin owaisi alliance | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

प्रकाश आंबेडकर - ओवैसींना झालेली गर्दी कोणाची झोप उडवणार ? 

दयानंद माने
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर व एमआयएमचे नेते असिदोद्दीन ओवेसी यांच्या सभेनंतर हे नवे समीकरण कोणाची झोप उडवणार व कुणाला सत्तेच्या सोपानावर चढवणार याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे.

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर व एमआयएमचे नेते असिदोद्दीन ओवेसी यांची बहुचर्चित व ऐतिहासिक अशी सभा अखेर काल (ता.२) आँक्टोबर या गांधी जयंतीच्या दिनी रेकॉर्ड ब्रेक गर्दीच्या साक्षीने पार पडली. या सभेनंतर हे नवे समीकरण कोणाची झोप उडवणार व कुणाला सत्तेच्या सोपानावर चढवणार याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे.

       राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीच्या निमित्ताने तिकडे वर्धा सेवाग्राममध्ये राहूल गांधी , सोनिया गांधी केंद्रातील भाजप सरकार व नरेंद्र मोदींवर निशाणा साधत होते तर इकडे औरंगाबादेत बाळासाहेब व ओवेसीही आपल्या आक्रमक शैलीत आरएसएस वर प्रखर टीका करत नरेंद्र मोदींना पुन्हा 'चाय' विकायला लावू, अशी भाषा करत होते. दोन्ही सभेत शत्रू सारखाच होता.

मात्र एक मोठा फरक होता तो म्हणजे आंबेडकर व गांधी ही राष्ट्रीय व्यक्तिमत्वे. सेवाग्रामात गांधींवर स्तुतीसुमने उधळली जात होती तर इकडे डॉ. आंबेडकरांवर. ओवेसींनी बाबासाहेब आंबेडकरांना देशातील सर्वात मोठा नेता अशी घोषणा करत दलित मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. संविधान सभेत जाण्यासाठी बाबासाहेबांना काँग्रेसने विरोध केला मात्र पश्चिम बंगालमधील मुस्लिमांनी त्यांना संविधान सभेत पाठविले.. या मुद्द्याचा वापर करत ओवेसी म्हणाले, "हमे अभीभी बाबासाईब आंबेडकर का कर्ज चुकाना है. बालासाहब आंबेडकर को संसद भेजना है."

 आमदार इम्तियाज जलील यांनीही सुरुवात आक्रमक करत  "देखो कौन आया, कौन आया, शेर आया शेर आया" अशी सुरुवात करत मुस्लीम तरुणांना २०१४ च्या निवडणुकीतील मुस्लीम मोहल्ल्यातील प्रचाराची आठवण करुन दिली. तसेच "इस ईलेक्शन मे अब एक नही दो शेर है", असे म्हणत दोन्ही नेत्यांच्या अनुयायांना चुचकारण्याचा प्रयत्न केला..

सभेला जमलेल्या दलित (अर्थात बौध्द समाजाची संख्या मोठी) व मुस्लीम तरुण लक्ष्य करुन ओवेसी व आमदार इम्तियाज जलील यांनी आपल्या भाषणाचा सारा रोख आक्रमक केला होता. 

आंबेडकर व एमआयएम एकत्र येण्याने काँग्रेस व राष्ट्रवादी या धर्मनिरपेक्ष आघाडीचे मोठे नुकसान होणार व भाजपला त्याचा फायदा होणार, त्यामुळे या आघाडीवर प्रखर अशी टीका काँग्रेस व समविचारी पक्ष व राजकीय निरीक्षकांकडून होत असतानाच खुद्द बाळासाहेबांनी मात्र या टीकेला आपल्या भाषणात उत्तर दिले नाही.

 या आघाडीवरील टीकेला बाळासाहेब उत्तर देतील अशा अपेक्षेने कान टवकारलेल्या राजकीय निरीक्षकांचा त्यांनी हिरमोड केला. उलट एमआयएमचे नेते मात्र बाबासाहेबांनी आपले मत विशिष्ठ एका पक्षालाच द्या, असे कधीही सांगितले नसून आपले मत स्वत:ला म्हणजे विचार व विवेक सांभाळून द्या, असे म्हटल्याचा मुद्दा अधोरेखित करत दलित मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला.

परिणाम काय होणार ?

शहरातील बीड बायपास रस्त्यावरील जाबिंदा लाँन्स येथे ही सभा झाली. या परिसरापासून शहरातील मुस्लिमबहुल भाग दूर आहे. तसेच एमआयएमची क्रेझही आता औरंगाबादेत ओसरली गेल्याने मुस्लिम मतदारातही एमआयएमला फार महत्व राहिले नाही.

त्यामुळे एमआयएमला मराठवाड्यात आपल्या समाजाबरोबरच दलित मतदानाचीही गरज आहे. आधी नांदेड मग औरंगाबाद महापालिका व आमदारकी व नंतर बीड नगरपालिका अशी चौफेर घोडदौड एमआयएमने केल्यानंतर त्यांची नवलाई संपली आहे. 

त्यातच जिथून सुरुवात झाली होती त्या नांदेड महापालिका निवडणुकीत सफाया झाल्याने नवसंजीवनीची गरज होती. ती गरज दलित मतदानाने भागणार आहे, हे विद्यमान आमदार ईम्तियाज जलील व त्यांचे मराठवाड्यातील सहकारी चांगले जाणून आहेत.

तर मराठवाड्यात आपले विश्वासू शिलेदार गमावलेल्या बाळासाहेबांनाही एका दगडात अनेक पक्षी मारावयाचे असल्याने या नव्या समीकरणाचा घाट घालण्यात आला आहे. हे समीकरण कसे, किती, कुठपर्यंत टिकून राहील, हे काळच सांगेल. हा काळ आता जवळ आल्याने फार काळ थांबावे लागणार नाही.
 

संबंधित लेख