पंतप्रधानांकडून शहरातील लोकांची डोकी भडकविण्याचे काम - प्रकाश आंबेडकर

पंतप्रधानांकडून शहरातील लोकांची डोकी भडकविण्याचे काम - प्रकाश आंबेडकर

अकोला : " शहरातील नक्षलवादाला कॉंग्रेसकडून खतपाणी ' हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य त्यांच्यावरील कामाचा अधिक ताण असल्याचे प्रतिक आहे. पंतप्रधान अशी वक्तव्ये करून शहरातील लोकांची डोकी भडकविण्याचे काम करीत असल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे (भारिप-बमसं) राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी अकोला येथे केली. 

येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा समाचार घेतानाच हिंदुत्ववादाच्या नावाखाली देशाची आर्थिक घडी कशी विस्कटली जात याची माहिती दिली. नक्षलवादाबाबत यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याची री ओढत पंतप्रधानांनी शहरी नक्षलवादाबाबत केलेले भाष्य म्हणजे संसर्गजन्य आजार असून, त्याची लागण सीएमपासून पीएमपर्यंत झाल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला. 

मुंबईत पोलिसांनी घेतलेल्या झाडाझडतीत नक्षली म्हणविणाऱ्यांकडे कुठलीही शस्त्रे सापडली नाहीत. उलट सनातन्यांकडे शस्त्र आढळून आली. निवडणुकीत राममुद्दा चालला नाही. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करणे, नोटाबंदीचा मुद्दाही चालला नाही. धमकाविण्याचे प्रकार झाले. शस्त्र दाखवून झाले, पण परिणाम झाला नाही. म्हणून आता शहरी नक्षलवाद ही संकल्पना मांडली जात आहे. शहरी नक्षलवाद हा मुद्दा पुढे करून शहरातील लोकांची डोकी भडकाविण्याचे काम सुरू असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. 

या पत्रकार परिषदेला भारिप-बमसंचे प्रदेश महासचिव युसूफ पुंजाजी, आमदार बळीराम सिरस्कार, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोडे, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, प्रसिद्धी प्रमुख प्रसन्नजीत गवई आदींची उपस्थिती होती. 

अर्थव्यवस्था गडगडणार 
देशातील 500 कुटुंबे सरकारच्या नितीला कंटाळून देशाबाहेर गेले. त्यांनी त्यांची संपत्ती विकून या देशाचा पैसा डॉलरमध्ये बदलून घेतला. पूर्वी अडीच हजार डॉलरपर्यंत बदल करण्याची मर्यादा होती. आता ती उठविण्यात आल्याने या कुटुंबांनी या देशातून डॉलर बाहेर नेला. परिणामी देशात डॉलरची टंचाई सुरू झाली व रुपयाचे अवमुल्यंन झाले. आता दोन दिवसात शेअर मार्केट कोसळणार. त्याचे कारण म्हणजे नोव्हेंबर रोजी नॉनबॅंकिंग हाऊसिंग खात्यांचे रिडिंग दरवर्षी होते. एक लाख कोटी पेपरचे रिडिंग यावेळी होत असते. पण यावेळी 40 हजार कोटी पेपरचेच रिडिंग झाले, तेही 8 नोव्हेंबर रोजी. आता दोन दिवस सुटी आली आहे. सोमवारी बाजार सुरू होताच त्याचे परिणाम दिसू लागतील, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com