भाजप विरोधकांना "ब्लॅकमेलिंग' करतोय - प्रकाश आंबेडकर

भाजप विरोधकांना "ब्लॅकमेलिंग' करतोय - प्रकाश आंबेडकर

जळगाव : विरोधी पक्षाच्या नेत्यांना भाजप सरकार ब्लॅकमेलिंग करीत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही भाजपला मदत करीत आहेत. यात कॉंग्रेस पक्ष लक्ष्य आहे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला धाकधुकीवर ठेवले आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष भरीव विरोध न करता थातूरमातूर विरोध करीत आहेत. अशा प्रकारामुळे सध्याचे राजकारण एका धोकादायक वळणावर आहे.असा घणाघाती आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जळगावात पत्रकार परिषदेत केला. 

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे एका कार्यक्रमानिमित्त ते आले आहेत. जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत बोलतांना ऍड. आंबेडकर म्हणाले "" भाजप शासन कोणालाही मदत न करणारे शासन आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा मोबदला अद्यापही दिलेला नाही. गरिबांची रोजगार हमीची कामे उन्हाळ्यात सुरूच केली नाहीत. समाजकल्याण खात्याचा निधी बंद केला, मुलांना देणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्त्याही बंद करण्यात आल्या आहेत. शिक्षण मर्यादित करण्याचा या सरकारचा धंदा आहे. 
दोन वर्षात कामच नाही. 
राज्यातील शासनाला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बोलताना ते म्हणाले, की राज्यातील शासनाने दोन वर्षात राज्यात कोणतेही चांगले काम केलेले नाही. आपले त्यांना आव्हान आहे, त्यांनी एकतरी काम केले असल्याचे दाखवून द्यावे. 
भाजप सरकारची लोकशाही नाही तर हिटलरशाही सुरू आहे. भाजप सरकार ब्लॅकमेलिंग करून कॉंग्रेसपक्ष संपविण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला कारवाईचा दंडुका दाखवून त्यांच्यात धाकधूक निर्माण केली जात आहे. भाजपची ही हिटलरशाहीच सुरू आहे. या अगोदर देशात व राज्यात असलेल्या सरकारानीं असा प्रकार केलेला नाही. मुलायमसिंह असा प्रकार करून त्यावेळी भाजपचे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचे नेतृत्व संपवू शकत होते. परंतु त्यांना ते केलेले नाही. ब्लॅकमेलिंगच्या या प्रकारामुळे राजकारण आज धोकादायक वळणावर आहे. 
संघटनांनी पुढे येण्याची गरज 
भाजपच्या या ब्लॅकमेलिंग प्रकारामुळे सर्वच पक्ष गर्भगळीत झाले आहेत. असे मत व्यक्त करून ते म्हणाले, की राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस केवळ थातूरमातूर विरोध करीत आहेत. जर त्यांनी विधिमंडळातच विरोध केला असता, बजेट अधिवेशनात सरकारवर कटमोशन आणले असते तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना मिळून जास्त आमदार झाले असते व सरकार पराभूत झाले असते. त्यामुळे शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला असता. पक्षाचा विरोध संपल्यामुळे आज संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे. त्यांनी सत्ताधाऱ्यांविरूध्द एकत्रित येऊन विरोध करण्याची गरज आहे. 
अधिकारीच भाजपला ब्लॅकमेलिंग करतील 
राज्यातील राजकीय ब्लॅकमेलिंगचा भाजपचा प्रकार गंभीर असल्याचे मत व्यक्त करून ऍड.आंबेडकर म्हणाले, आज भाजप कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना ब्लॅकमेलिंग करीत आहेत. त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढून कारवाईची धमकी देत आहे. परंतु उद्या अधिकारी वर्ग भाजपलाच "ब्लॅकमेलिंग'करून त्यांची भ्रष्टाचाराची लक्तरे बाहेर काढण्याची धमकी देईल. त्यामुळे ही बाब धोकादायक आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com