Pradeep Jaiswaal & Kishanchand Tanwani friendship of 38 years | Sarkarnama

तेरे जैसा यार कहा...जैस्वाल-तनवाणी यांची  ३८ वर्षाची घट्ट मैत्री

जगदीश पानसरे
रविवार, 5 ऑगस्ट 2018

राजकारणा पलीकडची ही आमची मैत्री अशीच कायम राहील असा विश्वास व्यक्त करतानाच 'सलामत रहे दोस्ताना हमारा' असेही जैस्वाल म्हणाले.

औरंगाबाद: गोट्या, पतंग, भवरे खेळत बालपणी जमलेली गट्टी आज 38 वर्षांनंतर दोघेही वेगवेगळ्या राजकीय पक्षात असतानाही कायम आहे. एकमेकविरोधात निवडणूक लढलो, पराभूत झालो, पण मैत्रीत अंतर येऊ दिले नाही, यापुढेही येऊ देणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त करत प्रदीप जैस्वाल आणि किशनचंद तनवाणी मैत्री दिनानिमित्त भरभरून बोलत होते.

शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल आणि पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, आताचे भाजपचे शहर-जिल्हा अध्यक्ष किशनचंद तनवाणी यांची मैत्री राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. गुलमडीवर, बालपण गेल्यानंतर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोघे राजकारणात आले.

तनवाणी यांना गुलमंडी  वार्डात तिकीट मिळावे म्हणून जैस्वाल यांनी प्रयत्न केले आणि मी पहिल्यांदा नगरसेवक झालो. पुढे आमदार होण्यासाठी त्यांची खूप मदत झाली. जैस्वाल नगरसेवक, महापौर झाले तेव्हा मी प्रयत्न केले आणि एकमेकांना सोबत घेऊन आम्ही राजकारणातही यशस्वी झाल्याचे तनवाणी सांगतात.

1999 च्या विधानसभा निवडणुकीत प्रदीप जैस्वाल यांना तिकीट मिळावे म्हणून मी उपोषण केले. उध्दव ठाकरे यानाही भेटलो, पण यश आले नाही. कालांतराने जैस्वाल खासदार झाले.

शिवसेनेचा शहर अधक्ष्य, नगरसेवक, महापौर असा माझाही राजकीय प्रवास सुरूच होता. विधान परिषदेवर निवडून गेलो. नंतर पराभूत झालो. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत प्रदीप जैस्वाल यांच्या ऐवेजी विकास जैन यांना पक्षाने उमेदवारी दिली. जैस्वाल अपक्ष उभे राहिले. पक्ष की मैत्री असा प्रश्न होता. मी शहर अध्यक्ष असल्याने जैन यांचा प्रचार केला. प्रदीप  जैस्वाल निवडून आले.

पण याची तक्रार किंवा नाराजी कधी आम्ही केली नाही किंवा त्याचा परिणाम आमच्या मैत्रीवर झाला नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली. मी शिवसेनेतून बाहेर पडलो. आणि भाजपने मला उमेदवारी दिली.

शिवसेनेने प्रदीप जैस्वाल यांना तिकीट दिले. आम्ही दोघे मित्र एकमेकांच्या विरोधात लढलो आणि हरलो. पण दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकमेकांना भेटलो. याचे अनेकांना आश्चर्य वाटले पण मैत्रीच्या आड राजकारण आणायचे नाही हे पथ्य आम्ही पाळले, त्यामुळेच आमची निस्वार्थ मैत्री टिकून असल्याचे तनवाणी अभिमानाने सांगतात.

आजही सोबत पतंग उडवतो-जैस्वाल

तनवाणी सोबतच्या मैत्री बद्दल जैस्वाल भरभरून बोलत होते. आमची मैत्री कौटुंबिक आहे. राजकारणातल्या यश अपयशाचे सावट कधी आम्ही त्यावर पडू दिले नाही. एकमेकांच्या सुख दुःखात आम्ही सहभागी होतो. नशिबा पलीकडे कुणाला काही मिळत नसते.

त्यामुळे जय, पराजय यापेक्षा मैत्रीला आम्ही अधिक महत्त्व देतो. 35 वर्षांपासून मी किशु न चुकता बालाजीला सोबत जातो. आमची कुटुंबही जोडली गेली आहे. आजही संक्रातिला मी किशुकडे पतंग उडवायला जातो.

राजकारणा पलीकडची ही आमची मैत्री अशीच कायम राहील असा विश्वास व्यक्त करतानाच 'सलामत रहे दोस्ताना हमारा 'असेही जैस्वाल म्हणाले.

 

संबंधित लेख