देशातला दुसऱ्या क्रमांकाचा ध्वजस्तंभ कोल्हापुरात होणार

देशातला दुसऱ्या क्रमांकाचा ध्वजस्तंभ कोल्हापुरात होणार

कोल्हापूर ः देशातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचा ध्वजस्तंभ कोल्हापुरात उभारला जात असून येत्या एक मे रोजी त्यावर ध्वज जरूर फडकणार आहे. हा स्तंभ केवळ 300 फूट उंचीचा इतकेच याचे वैशिष्ट्य नव्हे तर उंच ध्वजस्तंभ उभारणीच्या तंत्रातील एक वैशिष्ट्य म्हणूनही गणला जाणार आहे. ध्वजस्तंभ उभारणीला सव्वा महिन्याचाच अवधी उरल्याने युद्धपातळीवर त्याचे काम सुरू आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन व के.एस.बी.पी. यांच्या संयुक्त प्रयत्नातून या ध्वजस्तंभची उभारणी होत आहे. 


जमिनीपासून 300 फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यासाठी आता 21 फूट रुंद, 21 फूट लांब व 16 फूट खोलीचा पाया काढला आहे. या पायासाठी के.आय.टी.ने सॉइल बेअरिंग कपॅसिटी तंत्राद्वारे मार्गदर्शन केले आहे.

या पायात तब्बल साडेतीन टन लोखंडी सळी व 232 क्‍युबिक मीटर कॉंक्रिट घातले जात आहे. 300 फूट ध्वजस्तंभासाठी जी.आय. एपोक्‍सी कोटिंग खांब तयार केला जात असून 30 फुटाचा एक भाग असे दहा भाग जोडून तो उभा केला जाणार आहे आणि ध्वजस्तंभाचे वजन तब्बल 24 हजार किलो असणार आहे. 

पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील उद्यानात (पोलिस लाइन) ध्वजस्तंभ उभारला जाणार आहे. केवळ ध्वजस्तंभ नव्हे तर या ठिकाणी साउंड अँड शो तंत्रावर आधारित उद्यानही उभारले जात आहे. उंच फडकणारा ध्वज आजूबाजूचे वातावरण यामुळे राष्ट्रप्रेम जागृतीचे हे एक स्फूर्तिस्थळ ठरणार आहे. 

के.एस.बी.पी. या संस्थेचे सुजय पित्रे हे ध्वज उभारणीच्या कामावर नियंत्रण ठेवून आहेत. ते म्हणाले, ""ध्वज उभारणीसाठी टेंबलाई टेकडी, चित्रनगरी व पोलिस लाइन अशा तीन जागांचा विचार झाला. त्यात पोलिस लाइनच्या जागेला प्राधान्य देण्यात आले. कारण पुढील देखभालीच्या दृष्टीने हेच ठिकाण योग्य होते.

बजाज इलेक्‍ट्रिकल कंपनी या ध्वजस्तंभाची उभारणी करत आहे. 30 फुटांचा एक भाग अशा पद्धतीने ध्वजस्तंभ आणून तो येथे पूर्ण जोडून क्रेनच्या साहाय्याने उभा केला जाणार आहे व इलेक्‍ट्रिक मोटारीच्या साहाय्याने ध्वज वरती चढवला जाणार आहे. 
पॉलिस्टरच्या विशिष्ट कापडाचा वापर 
ध्वजस्तंभ 300 फूट उंचीचा व त्यावर फडकणारा तिरंगा ध्वज 90 फूट लांब व साठ फूट रुंद म्हणजे 5400 चौरस फुटांचा असणार आहे. उंचावरील वाऱ्याच्या झोताने ध्वजाचे नुकसान होऊ नये म्हणून त्यासाठी पॉलिस्टरचे विशिष्ट कापड वापरले जाणार आहे. शहराच्या कोणत्याही भागातील तीन मजली इमारतीच्या टेरेसवरून हा ध्वज दिसू शकणार आहे. तो रात्रीही फडकता राहणार आहे. त्यासाठी त्यावर दिव्याचे सहा झोत अखंड कार्यरत राहणार आहेत. 
सर्वात उंचीचा ध्वज वाघा बॉर्डरवर 
देशात सर्वात उंचीचा ध्वज वाघा बॉर्डरवर आहे. आता कोल्हापुरात उभारला जाणारा ध्वज त्या खालोखाल उंचीचा आहे. राज्यात सध्या 237 फूट उंचीचा ध्वज कात्रजमध्ये आहे. त्यामुळे कोल्हापुरातील 300 फूट उंचीचा ध्वज राज्यात सर्वात उंच ठरणार आहे. ध्वजस्तंभ तळात पाच फूट रुंद व 300 फुटावर टोकाला सोळा इंच असणार आहे. 
दृष्टिक्षेपात 
ध्वजस्तंभ उंची ः 300 फूट 
फडकणारा झेंडा ः 90x60 फूट आकाराचा 
ध्वजस्तंभासाठी ः पाया 16 फूट खोल 
ध्वजस्तंभ वजन ः 24 हजार किलो 
ध्वजस्तंभ पाया ः साडेतीन टन सळीचा वापर 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com