Politics NCP Mumbai News | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

भाजपचे दलित प्रेम बेगडी - तारिक अन्वर

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 जून 2017

भाजपची आजपर्यंतची भूमिका ही दलित विरोधात राहिली आहे, त्यामुळेच  त्यांची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेश, हरियाणा आणि गुजरातमध्ये दलितांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होताहेत, या सर्व घटनांमुळे भाजपची अडचण झाली आहे. त्यातच समोरच गुजरातच्या निवडणुका येणार असल्याने त्यांनी राष्ट्रपती पदासाठी दलित उमेदवार निवडला आहे - तारिक अन्वर

मुंबई - भाजपला देशातील दलितांविषयी कोणताही आदर, आणि त्यांच्याबद्दल सहानुभूतीची भावना नाही, त्यांचे दलित प्रेम हे बेगडी आणि केवळ राजकीय स्वार्थ साधणारे आहे, त्यामुळे दलित उमेदवार राष्ट्रपती पदासाठी देण्यामागे भाजपचा दलितांना सन्मान देण्याचा विचार नाही, हा केवळ राजकीय निर्णय असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस व खासदार तारिक अन्वर यांनी आज राष्ट्रवादी भवन येथे केली.

भाजपची आजपर्यंतची भूमिका ही दलित विरोधात राहिली आहे, त्यामुळेच  त्यांची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेश, हरियाणा आणि गुजरातमध्ये दलितांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होताहेत, या सर्व घटनांमुळे भाजपची अडचण झाली आहे. त्यातच समोरच गुजरातच्या निवडणुका येणार असल्याने त्यांनी राष्ट्रपती पदासाठी दलित उमेदवार निवडला आहे, मात्र या मागे भाजपकडून देशातील दलितांना सन्मान देण्याचा त्यांचा विषयच नाही असेही खासदार अन्वर म्हणाले.

भाजपने आपला राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहीर करण्यापूर्वी आम्ही त्यांना विचारणा केली होती, मात्र त्यांच्याकडून सांगण्यात आले नाही, आणि अचानक रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर करण्यात आले, जेव्हा की सर्वसंमतीने एखादे नाव पुढे आले असते, तर त्यावर एक चांगला निर्णय झाला असता, मात्र आता आम्ही 22 तारखेला यूपीए आघाडीच्या बैठकित जो प्रस्ताव येईल आणि त्यावर निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल, त्यासाठी इतर पक्षाशी बोलणे सुरू आल्याचेही ते म्हणाले.

आम्हाला सर्वसमावेशक असे नाव अपेक्षित आहे. मात्र, भाजपला केवळ दलित, आदिवासी समाजाच्या नावाखाली राजकारण करायचे असल्याचेही अन्वर म्हणाले दरम्यान, भाजप समर्थक चित्रपट निर्मात्याकडून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आणीबाणीच्या काळावर आधारित चित्रपट काढून त्यांना बदनाम केले जात असल्याबद्दल अन्वर यांनी जोरदार आक्षेप घेत त्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. इंदिरा गांधी यांचे बांगलादेश निर्मितीतील कार्य जगाने पाहिले होते, त्याची जाणीव भाजपने ठेवावी असेही ते म्हणाले

संबंधित लेख