In politics attempts are made by opponents to topple down government | Sarkarnama

राजकारणात विरोधी विचारांचे सरकार खाली खेचण्याचा प्रयत्न होतच असतो  : प्रकाश आंबेडकर

मृणालिनी नानिवडेकर
रविवार, 2 सप्टेंबर 2018

कोणत्याही दुसऱ्या विचारसरणीचे सरकार खाली खेचावे यासाठी अन्य राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते प्रयत्न करीत असतातच. 

-प्रकाश आंबेडकर

मुंबई :"  पुण्यातील एल्गार परिषदेला नक्षलवाद्यांनी 15 लाखांचा निधी पुरवल्याचा आरोप सिद्ध करण्यासाठी, तसेच विचारवंतांना परदेशी शक्‍ती निधी पोचवत असल्याच्या 'मनी ट्रेल'चे पुरावे पोलिसांनी सादर करावे," अशी मागणी रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

या प्रकरणात पोलिसांना काही रस असल्याची शंका त्यांनी व्यक्‍त केली. यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याचे सांगितले . 

आंबेडकर म्हणाले, की"  नक्षलसमर्थकांना परदेशातून निधी मिळाला, तर त्याचे ट्रेल सादर केले जावे. पॅरिसच्या परिषदेला अटक केलेल्या मंडळींपैकी कोण गेले होते, ते कुठल्या विमानतळावरून गेले, त्यांनी तेथे काय भाषणे केली, याचे पुरावे सादर करायला हवेत. फ्रान्स किंवा नेपाळ किंवा अमेरिका या देशांना तुमच्या भूमीचा भारतविरोधी कामासाठी वापर झाल्याबद्दल नाराजी व्यक्‍त करणारी पत्रे भारत सरकारने पाठवली का, याचाही तपशील पुढे यायला हवा."

 सनातनशी संबंधित गुन्हेगारांना पकडले तेव्हा पोलिसांनी पत्रपरिषदा का घेतल्या नाहीत?  असा प्रश्‍न उपस्थित केला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रमाणे भारतीय नेत्यांच्या हत्येचे कट रचले जात असल्याचे पत्र अद्याप समोर का आणले जात नाही? काही अराजकीय संस्था स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून सरकारवर टीका करीत असतील, तर त्यांच्याविरोधात आरोपांचे कुभांड रचणे हा प्रकार अयोग्य असल्याचे मुख्यमंत्र्यांना भेटीत सांगितल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. 

जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्या मदतीने प्रकाश आंबेडकर सरकार उलथवून टाकण्याचा कट रचत असल्याचा आरोप उपलब्ध कागदपत्रांतून समोर आला आहे, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की "कोणत्याही दुसऱ्या विचारसरणीचे सरकार खाली खेचावे यासाठी अन्य राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते प्रयत्न करीत असतातच."
 

संबंधित लेख