Politicians banned entry in Vikharan village | Sarkarnama

विखरणला पाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी 

रणजीत राजपूत
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

*

विखरण (धुळे) : विखरण देवाचे (ता.शिंदखेडा, जि. धुळे) येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांना गावबंदीचा ठराव आज विशेष ग्रामसभेत मंजूर केला. 

सरपंच दशरथ अहिरे अध्यक्षस्थानी होते. मात्र ठरावाला माजी उपसरपंच विक्रम तायडे यांनी विरोध नोंदवला, तर ग्रामसेविका आर. एस. विसपुते यांनी ठरावाबाबत असहमती नोंदवली. विखरण (देवाचे) येथे सहा महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई आहे. 20 ते 21 दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. या पार्श्‍वभूमीवर विशेष ग्रामसभा सरपंच अहिरे यांनी बोलविली. 

गावभर दवंडीद्वारे ग्रामस्थांना उपस्थितीचे आवाहन केले. विखरणच्या पाणीटंचाईकडे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे गावात 19 नोव्हेंबरला भरणाऱ्या यात्रेत सर्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांविरोधात निषेध फलक लावून त्यांना गावबंदी करण्यावर चर्चा झाली. 

त्यात बहुमताने ठराव पारित झाला. यावेळी सरपंच अहिरे, उपसरपंच शिवाजी पाटील, माजी सरपंच रामसिंग गिरासे, माजी उपसरपंच विक्रम तायडे, भगवान पाटील, भीमसिंग गिरासे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित लेख