गावातील जनता पार्टीचा अध्यक्ष ते महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष : वाटचाल रावसाहेब दानवेंची

1977 चा तो काळ, नव्यानेच जनता पार्टीची स्थापना झाली होती. आमच्या गावात कुणी अध्यक्ष व्हायला तयार नव्हतं. मग मीच अध्यक्ष झालो. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सभापती आणि 1985 मध्ये सर्वप्रथम विधानसभेची निवडणूक लढलो. पराभव नशिबी आला, पण त्यापुढली दोन विधानसभा, चार लोकसभा निवडणुका मी जिंकलो. केंद्रात पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळात काम करण्याची संधी मिळाली, आणि आता पुन्हा महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळतोय - रावसाहेब दानवे
Raosaheb Danve
Raosaheb Danve

भोकरदन : ''1977 चा तो काळ, नव्यानेच जनता पार्टीची स्थापना झाली होती. आमच्या गावात कुणी अध्यक्ष व्हायला तयार नव्हतं. मग मीच अध्यक्ष झालो. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सभापती आणि 1985 मध्ये सर्वप्रथम विधानसभेची निवडणूक लढलो. पराभव नशिबी आला, पण त्यापुढली दोन विधानसभा, चार लोकसभा निवडणुका मी जिंकलो. केंद्रात पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळात काम करण्याची संधी मिळाली, आणि आता पुन्हा महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळतोय''..... अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी आपला राजकीय प्रवास 'सरकारनामा'शी बोलतांना उलगडून सांगितला. 
ही वाटचाल खुद्द दानवे यांच्याच शब्दात.......

जालना येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना 1977 च्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीत तरूणांचा मोठा सहभाग होता. आमच्या घरात कुणीच राजकारणात नव्हतं. पण मित्रांच्या आग्रहाखातर मी त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरलो. जालना लोकसभा मतदारसंघातून पुंडलीक हरी दानवे यांना जनता पक्षाने उमेदवारी दिली होती ते निवडून आले. 

लोकसभा झाल्यानंतर लगेच 78 च्या विधानसभा निवडणुका आल्या, त्यातही प्रचार केला तेव्हा विठ्ठलराव सपकाळ जनता पक्षाकडून निवडून आले. दोन निवडणुकीतील प्रचारात घेतलेला सहभाग आणि मिळालेले यश यामुळे आत्मविश्‍वास बळावला होता. त्या जोरावर जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाकडे उमेदवारी मागितली. पंचायत समितीची उमेदवारी मिळाली आणि मी निवडून आलो. माझ्या राजकीय जीवनातला तो पहिला विजय होता. 

1978 ची विधानसभा 80 मध्ये बरखास्त झाली. त्यानंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि तेव्हा पंचायत समितीचे सभापती असलेले रंगनाथ पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिली, ते निवडून गेले आणि मला सभापती होण्याची संधी मिळाली. त्यानंतर संपुर्ण तालुका मी पिंजून काढला. लोक भेटत गेले संपर्क वाढत गेला, लोकांच्या समस्या सोडवण्याचा जणू मला छंदच जडला. ग्रामपंचायत, पंचयात समिती सभापती म्हणून काम केल्यानंतर मी सहकार क्षेत्रातल्या जिनिंग प्रेसिंग, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटीच्या निवडणुका लढवल्या. त्यामुळे जनरल इलेक्‍शन आणि सहकार क्षेत्रातील अनुभव माझ्या गाठीशी होता. 

विधानसभेची पहिली निवडणूक आणि पराभव
1985 मध्ये विधानसभा निवडणुका लागल्या. तत्पुर्वी 31 ऑक्‍टोबर 84 मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली होती. देशभरात काँग्रेसमय वातावरण होते. लोकसभा निवडणुकीत राजीव गांधी यांच्या काँग्रेस पक्षाला दोन तृतीयांश बहुमत मिळाले होते. अशा वातावरणात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या.

माझ्यापेक्षा मातब्बर विठ्ठलराव सपकाळ, पुंडलीक हरी दानवे असे उमेदवार असतांना स्व. प्रमोद महाजन यांनी तरूणांना संधी देण्याचा निर्णय घेतला होता. महाजन यांच्यांशी माझा संपर्क 1977 पासून होता. त्यावेळी मराठवाड्यात फिरणारे दोनच नेते होते. ते म्हणजे स्व. प्रमोद महाजन व स्व. गोपीनाथ मुंडे. 

आपल्या उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आणि इच्छाही नव्हती. पण बळजबरीने मला बोलावून विधानसभेची उमेदवारी प्रमोदजींनी दिली. तेव्हाचा प्रचार म्हणजे मीच उमेदवार, मीच गाडी चालवायचो, गावागावंत जाऊन भाषण करायचो. तेव्हा आजच्या इतके कार्यकर्ते नसायचे. देशातील काँग्रेसमय वातावरण आणि निवडणुक लढवण्याची मानसिकता नसल्याने पहिल्या निवडणुकीत पराभव झाला. साडेतेराशे मतांनी हरलो. 

पण या पराभवातून खूप शिकायला मिळाले, आत्मविश्‍वास वाढला आणि आता 1990 मधील विधानसभा निवडणुकीत जिंकायचंच असा निर्धार करून पुढील पाच वर्ष मतदारसंघात काम केले आणि 25 हजार मतांनी विजयी झालो. विजयाची हीच परंपरा 1995 मध्ये कायम ठेवली, दुसऱ्यांदा आमदार झालो. राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता आली. 

अटलजींना पंतप्रधान करण्यासाठी..
दोनवेळा भोकरदन मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर 1999 मध्ये लोकसभेच्या निवडणुका आल्या. जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी कुणाला द्यायची हा विचार पुढे आला तेव्हा प्रमोद महाजन यांनी पुन्हा माझे नाव पुढे केले. लोकसभा लढवण्याची इच्छा नसल्याचे मी त्यांना सांगितले. पण ते म्हणाले रावसाहेब मला तुला खासदार नाही करायचं, अटलजींना पंतप्रधान करायच आहे. त्यामुळे मला रेसवर पळणारे घोडेच पटावर लावायचे आहे. तु नाही म्हणाला तरी उमेदवारी तुलाच देणार आहे. पुढे झालेही तसचे आणि जालना लोकसभा मतदारसंघातून मी 1 लाख 23 हजार मतांनी निवडून आलो. त्यानंतर सलग तीन लोकसभा निवडणुका मी जिंकलो. दोन विधानसभा आणि चार लोकसभा सलग जिंकण्याचा मान मला मिळाला. 

पहा रावसाहेब दानवे यांचा राजकीय प्रवास छायाचित्रांतून फोटो गॅलरीमध्ये


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com