poliotical turmoil in gadchiroli congress as ex-mla usendi meets senior leaders in new delhi  | Sarkarnama

गडचिरोलीत माजी आमदार उसेंडींमुळे कडाक्याच्या थंडीत `उष्मा'

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 31 डिसेंबर 2018

गडचिरोली जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्याने गडचिरोली जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या राजकारणातील उष्मा वाढला आहे. 

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्याने गडचिरोली जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या राजकारणातील उष्मा वाढला आहे. 

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीसाठी कॉंग्रेसने वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. अ. भा. कॉंग्रेस समितीने दोनवेळा पाहणी करून अहवाल तयार केला आहे. यात काही लोकांची नावे निश्‍चित केली आहेत.

नक्षलप्रभावी व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात कॉंग्रेसला यावेळी सकारात्मक वातावरण असल्याचे बोलले जात आहे. या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी इच्छुकांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

गडचिरोली जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी यापूर्वीच दावा केला आहे. गडचिरोली येथून त्यांनी यापूर्वी विधानसभा निवडणुकीत यश मिळविले होते. एक उच्चशिक्षित तरूण नेते म्हणून जिल्ह्यात त्यांची ओळख आहे. त्यांनी नुकतीच दिल्लीला भेट देऊन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिाकार्जुन खरगे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांची भेट घेतली. 

या संदर्भात `सरकारनामा'शी बोलताना डॉ. उसेंडी म्हणाले, दिल्लीला जाऊन या नेत्यांची भेट घेतली आहे. त्यांना जिल्ह्यातील राजकारणाबद्दल माहिती दिली. तसेच या भागातील विशेष प्रश्‍नांबद्दल नेत्यांना अवगत केले. या तिन्ही नेत्यांशी अत्यंत सविस्तर चर्चा झाल्याचे डॉ. उसेंडी यांनी सांगितले.

डॉ. उसेंडी यांच्या उमेदवारीला काही गटांचा विरोध असल्याने त्यांच्या उमेदवारीला आव्हान दिले जात आहे. यात डॉ. कोडवते यांच्या उमेदवारीला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पाठिंबा दिला आहे. या राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. उसेंडी यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्वाचे मानले जात आहे. 
डॉ. उसेंडी यांच्या दिल्ली दौऱ्याने गडचिरोली जिल्ह्यातील कॉंग्रेसचे वातावरण मात्र तापले आहे.  
 

संबंधित लेख