विद्यापीठासह, महाविद्यालये पोलिस विभागाच्या रडारवर -परिक्षा नियंत्रकाची होणार चौकशी

विद्यापीठासह, महाविद्यालये पोलिस विभागाच्या रडारवर -परिक्षा नियंत्रकाची होणार चौकशी

औरंगाबाद - साई इंस्टीट्यूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्‍नॉलॉजीचे कारनामे बाहेर आल्यानंतर आता असे गैरप्रकार करणारी महाविद्यालये पोलिसांच्या कचाट्यात येणार आहेत. विशेषत विद्यापीठातील जबाबदारांसह परिक्षा नियंत्रकांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिस आयूक्त यशस्वी यादव यांनी गुरूवारी (ता. 18) दिली.

साई अभियांत्रिकी महाविद्यालायाकडून विद्यापीठ कायदा धाब्यावर बसवून गैरमार्ग अवलंबविला. परिक्षा झाल्यानंतरही पुन्हा पेपर सोडवण्याचे कारस्थान करण्यात आले. यात प्राचार्य, प्राध्यापक व कस्टोडीयनचा सहभाग असल्याचे समोर आले. या बाबी संस्थाचालक गंगाधर मुंढे व मंगेश मुंढे यांना माहिती होत्या. त्यांचेही याला समर्थन होते, अशा बाबींची कबूली साई महाविद्यालयाचा प्राध्यापक विजय आंधळे याने पोलिसांकडे दिली. त्यामुळे संस्थाचालक, प्राचार्यासह प्राध्यापकांनी शिक्षणाचे 'दिवे' लावल्यासे स्पष्ट झाले आहे.

विशेषत: पुन्हा पेपर सोडवणाऱ्या अभियांत्रिकी विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांच्या अकलेचे दिवाळेही निघाले. पोलिस आयुक्त यादव म्हणाले, ''ज्यावेळी परिक्षेची निर्धारित वेळ संपली, त्यावेळीच विद्यापीठाने पेपर स्वत:च्या ताब्यात का घेतले नाहीत, ते पेपर का घेवून जात नव्हते, याची विचारणा केली जाईल. तसेच विद्यापीठातील जबाबदारांसह परिक्षा नियंत्रकांची चौकशी केली जाईल. असे गैरप्रकार करणारी महाविद्यालये आमच्या रडारवर आहेत.'' एकप्रकारे गैरप्रकार करणाऱ्यांभोवती कारवाईचा फास आवळला जाईल असाच इशारा त्यांनी महाविद्यालयांना दिला आहे.


राजकीय दबाव होता..

साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचा गैरप्रकार उजेडात आल्यानंतर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. यामुळे हितसंबंध असलेल्या काही राजकारण्यांनी पोलिस विभागातील वरिष्ठांना फोनही केले. तसेच बऱ्याच जणांनी पोलिस आयुक्तालयात धाव घेतली होती. कारवाईनंतर पोलिसांवर राजकीय दबाव होता, परंतू, त्याला न जुमानता पोलिसांनी  सर्वांवर गून्हे नोंदवून त्यांना अटक केली.

राजकीय पाठबळामूळे निश्‍चिंत होते सिताराम सुरे

शिवसेनेचे नगरसेवक असलेले सिताराम सुरे यांचाच मुलगा परिक्षार्थी असल्याने त्याच्या दिमतीसाठी घरीच परिक्षा देता यावी, म्हणून ते स्वतः प्रयत्नशिल होते. विशेषत: महाविद्यालयाकडूनही त्यांना होकार दर्शविण्यात आला. राजकीय पाठबळ व कुणाचाही अडसर होणार नाही याचा फाजिल आत्मविश्‍वासच नडला अन..पोलिसांच्या सापळ्यात सर्वजण अडकले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे नगरसवेक सिताराम सुरे यांचा मुलगा किरण हा साई अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतो. मुलाला पास करण्यासाठी सर्वकाही करण्याची सुरेंची तयारी होती. यातूनच मित्रपक्षाशीच संबंधित असलेल्या साई महाविद्यालयातील काही मंडळींशी त्यांची बोलणी झाली. सुरे शिवसेनेचे नगरसेवक आहेत, त्याशिवाय सत्ताधारी असल्याने त्यांच्या भोवती राजकीय वलय आहे. वजनही आहे, अशी धारणा पेपर 'मॅनेज' करणाऱ्यांची झाली. विशेषत: सुरेवाडी परिसरात कसलीच अडचण नाही. आपलाच वार्ड व परिसर असल्याने कुणाला काही थांगपत्ता लागणार नाही, असा फाजिल आत्मविश्‍वास सुरेंना होता. शिवाय पोलिसांनाही या बाबी कळणार नाहीत. कळाल्यासही त्यांच्याकडून एवढी मोठी  कारवाई होईल असेही त्यांना वाटले नव्हते. या सर्व बाबींमुळे ते निश्‍चिंत होते. परंतू या फाजिल आत्मविश्‍वास त्यांच्याच अंगलट आला. केवळ तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी अख्ख्या पेपर मॅनेज करणाऱ्या यंत्रणेलाच सूरूंग लावले.

जमलेल्या दूचाकींवरून संशय

सिताराम सूरे यांच्याच घरात परिक्षा केंद्र असल्याची बाब कळू नये म्हणून विद्यार्थ्यांच्या दुचाकी सुरेंच्या घरासमोर पार्क केल्या जात नव्हत्या. परिसरात कुठेही दुचाकी लावल्या जात होत्या. याचा त्रास स्थानिकांना सूरू झाला. तसेच याबाबत दुकाने, पानटपऱ्यांवर व परिसरातच चर्चा सूरू झाली. सुरेंच्या घरी कार्यकर्त्यांऐवजी विद्यार्थ्यांची गर्दी पाहून लोक संशयाने पाहू लागले. त्यातूनच सारा प्रकार पोलिसांपर्यंत सहज पोचला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com