police to take action on midnight clelebrations | Sarkarnama

 मध्यरात्री वाढदिवसानिमित्त फटाक्यांचे बार काढणाऱ्यांचे आता  बारा  वाजणार  

सुधाकर काशीद 
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

हा प्रश्न एकट्या कोल्हापूर शहराचा नाही त्यामुळे राज्यातील अन्य भागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी  अभिनव देशमुख यांच्या पासून योग्य  प्रेरणा घेऊन  मध्यरात्री फटाक्यांचे आवाज करणाऱ्या धनदांडग्या आणि उन्मत्त लोकांवर कारवाई करणार का हे देखील पाहणे महतवाचे ठरणार आहे . 

कोल्हापूर: कोल्हापूर  पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मध्यरात्री वाढदिवसानिमित्त फटाक्यांचे बार काढणारयांचे  बारा वाजविण्याचा संकल्प केला असून आता गरज आहे ती नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करण्याची ! 

कोल्हापूर  पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनीसांगितले की ," रात्री बारा वाजता रस्त्यावर चौकात वाढदिवस साजरा करणे, फटाके उडवून इतरांची झोपमोड करणे हा गंभीर गुन्हा आहे. यावर कशी कारवाई करायची याचे स्पेसिफिक निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. नागरिकांनी न घाबरता जवळच्या पोलिस ठाण्याला, 100 नंबरला किंवा कोणी दखल घेतली नाही तर 8652573333 या माझ्या वैयक्तिक नंबरवर वाढदिवस कोणाचा एवढी माहिती द्यावी, जरूर कारवाई होईल."  

दिवाळीचा सण असू दे नाहीतर नसू दे, शहरात रात्री बरोबर बारा वाजता फटाक्‍यांचा दणका सुरू होतो. अलीकडे असे फटाके निघाले आहेत की एक फटाका लावला की त्यातून आकाशात पाठोपाठ 20 फटाके उडत राहतात. शांत वातावरणात दणकाच देत राहतात. 

लोक ओळखतात, रात्री बारा वाजता असे दणकेबाज फटाके म्हणजे कोणाचा तरी वाढदिवस. मग अंथरुणातूनच त्याला शिव्या घालतात. कूस बदलतात आणि पुन्हा झोपी जातात. रात्री दहानंतर फटाके उडविण्यावर सर्वोच्च न्यायालयाची बंदी असली तरी कोल्हापुरात आणि राज्यातील बहुतांश शहरात  कोणत्या ना कोणत्या भागात रात्री बारा वाजता रोज असे फटाके उडत राहतात.

रात्री वाढदिवस साजरा करणारे म्हणजे परिसरातली टोळकीच आहेत. त्यांना थेट रोखणे नागरिकांना शक्‍य नसते. कारण तसे करणाऱ्याला त्रास होण्याची भीती असते. त्यामुळे पोलिसांनी उदाहरण म्हणून पाच-सहा जणांवर कठोर कारवाई केली तरी बऱ्यापैकी इतरांची झोपमोड करून असा वाढदिवस करणाऱ्यावर जरब बसू शकणार आहे.

रात्री दहानंतर फटाके न उडवण्याच्या निर्बंधाचे सर्वसामान्यांतून स्वागत होत आहे. या निर्बंधाचे शंभर टक्‍के नाही, पण बऱ्यापैकी चांगले परिणाम दिवाळीच्या काळात दिसले आहेत. पोलिसांनी रात्री 10 नंतर फटाके उडवणांऱ्यावर प्रतीकात्मक तरी कारवाई केली आहे. पण कोल्हापुरात रात्री बारा वाजता फटाके लावून आपला वाढदिवस जगाला कळवण्याची एक विचित्र पद्धत आहे. 

लोक झोपले असतील याची पर्वा कोणी करत नाही. फटाक्‍यांच्या आवाजाने रात्री दचकून लहान मुले, वृद्ध लोक, आजारी लोक उठतील, त्यांना त्रास होईल, याची फिकीरही कोणी करत नाही. आपला वाढदिवस म्हणजे काहीही करायला रान मोकळे, अशा आविर्भावात हे वाढदिवस साजरे होतात. केवळ जुन्या शहराचा भाग नव्हे तर उपनगरापर्यंतही अशा दणकेबाज वाढदिवसाचे लोण पोचले आहे. पोलिसांनी थोडी जागरुकता दाखवून "ऑन द स्पॉट' कारवाई सुरू केली तर पुढच्यांना योग्य तो इशारा मिळणार आहे आणि शहरवासीयांची झोपमोड टळणार आहे.

 

संबंधित लेख