police security to baburao gurav | Sarkarnama

प्रा. बाबुराव गुरव यांना पोलिस संरक्षण; एटीएसने तासगावातील दोघांना उचलले! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

 गेल्या दोन वर्षापासून मला पोलिसांनी संरक्षण दिले आहे. मात्र अशा काही संरक्षणाची मला गरज नाही असे मी यापुर्वीच कळवले होते. मात्र आज पोलिस कर्मचारी सकाळी घरी आला. त्याने संक्षणाशिवाय बाहेर पडू नका असे आग्रहीपणे सांगितले आहे.

-प्रा. बाबुराव गुरव 

सागंली : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासह पुरोगामी विचारवंतांच्या हत्यासत्राच्या तपासाचा भाग म्हणून आज दहशतवाद विरोधी पथकाने तासगावमधून दोघांना उचलले. 

दरम्यान, कर्नाटक पोलिस आणि नालासोपारा प्रकरणातून पुरोगामी नेत्यांची हिटलिस्टच पुढे आली असून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या बंदोबस्तात वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. 

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पाच वर्षांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर कॉम्रेड गोविंद पानसरे, कर्नाटकातील प्रा. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या. या सर्व हत्यांच्या तपासाला पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासामुळे गती मिळाली आहे. 

नालासोपारा प्रकरणातून संशयित आरोपी सचिन प्रकाशराव अंदुरे याला औरंगाबाद येथे "सीबीआय'ने अटक केली. त्यानंतर "सीबीआय' आणि "एटीएस'कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ठिकठिकाणी छापेसत्र सुरू आहेत. आज सकाळी मुंबईतील "एटीएस'चे पथक तासगावात येवून छापे टाकले. तीन तासांत दोन संशयितांच्या सखोल चौकशी करून रात्री उशीरा ताब्यात घेतल्याचे समजते. त्या दोघांची नावे अद्यापही समोर आली नाही. मात्र त्यानंतर तासगावमध्ये चर्चेला उधाण आले. दरम्यान, पुरोगामी विचारवंत प्रा. बाबुराव गुरव यांना पोलिस सुरक्षा देण्यात आली आहे. 

 

संबंधित लेख