Police save life of 3 Maratha agitators in Nagpur | Sarkarnama

रेल्वे धडाडत आली पण पोलिसांनी आंदोलकांना ऐनवेळी रुळावरून बाजूला खेचले

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

तेवढ्यात नागपूर-बैतुल ही गाडी वेगाने येत होती. हे पाहताच पोलिसांना या तरुणांना अक्षरशः खेचून बाजूला केले. काही क्षण विलंब झाला असताना निश्‍चित अनर्थ घडला असता.

नागपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे आंदोलक अचानकपणे रेल्वे रुळावर आले. याचवेळी वेगाने रेल्वे गाडी येत होती. यावेळी पोलिसांनी दाखविलेल्या समयसूचकेतेमुळे तीन आंदोलकांचे प्राण वाचले. 

नागपुरातील मानकापूर परिसरात मराठा तरुणांनी टायर पेटवून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराला पोलिसांनी आक्षेप घेतला. पोलिसांनी हुसकावून लावल्यानंतर हे तरुण तेथून जवळच असलेल्या रेल्वे ब्रिजवर पोहोचले. तेथून यातरुणांना पिटाळून लावल्यानंतर ते रेल्वे रुळावर आले. एका रेल्वे रुळावर झोपले होते. या ट्रॅकवर कोणतीही गाडी येत नव्हती. पोलिसांना त्यांना तेथून उठायला सांगितल्यानंतर ते तरुण बाजूच्या रेल्वे रुळावर झोपले.

तेवढ्यात नागपूर-बैतुल ही गाडी वेगाने येत होती. हे पाहताच पोलिसांना या तरुणांना अक्षरशः खेचून बाजूला केले. काही क्षण विलंब झाला असताना निश्‍चित अनर्थ घडला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यानंतर या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे मनोज नलावडे, दीपक इंगळे, महेश माने, तेजसिंग शिर्के व प्रशांत मोहिते अशी आहेत. या तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर काहीवेळांना या तरुणांना सोडून देण्यात आले.

संबंधित लेख