Police officer Ashvini Gore Bindre Missing case PI Kurundkar | Sarkarnama

बिंद्रे-गोरे बेपत्ता प्रकरण : गुन्हा घडल्यानंतर अभय कुरुंदकरांचे तीन आठवडे देवदर्शन 

सरकारनामा  
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

गुन्हा घडल्यानंतर अभय कुरुंदकर आणि वाहनचालक कुंदन भंडारी हे दोघेही तीन आठवडे एकत्र देवदर्शनासाठी सोबत फिरत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

नवी मुंबई  : महिला पोलिस अधिकारी अश्विनी बिंद्रे-गोरे बेपत्ताप्रकरणी अभय कुरुंदकरच्या चालकापाठोपाठ आता नवी मुंबई पोलिसांनी संशयावरून कुरुंदकरचा बालपणीचा मित्र महेश फळणीकरला पुण्यातून अटक केली आहे. मंगळवारी  महेश फळणीकर याच्यासोबत चालक कुंदन भंडारी या दोघांना पनवेल न्यायालयात हजर केले. त्यांना 1 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

महेश मनोहर फळणीकर आणि अभय कुरुंदकर हे एकाच गावातील आहेत. फळणीकर हा अभय कुरुंदकर याचा जवळचा मित्र आहे. पोलिसांना अभय कुरुंदकर याच्या मोबाईलच्या तांत्रिक तपासातून या गुन्ह्यासंदर्भात उपयुक्त माहिती मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असण्याचा पोलिसांना संशय आहे.

त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अश्विनी बिंद्रे बेपत्ता झाल्यापासून अभय कुरुंदकर आणि कारचालक कुंदन भंडारी यांचे मोबाईल लोकेशन आसपास आढळले आहे. त्यामुळे कुंदन भंडारी हा अभय कुरुंदकर याच्यासोबत असल्याचा आणि त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.

आरोपी अभय कुरुंदकर याने स्वत:जवळ लाकूड कापण्याचे कटर मशिन बाळगल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या कटर मशिनची माहिती आरोपी कुंदन भंडारी याच्याकडेच असल्याचे तपासात आढळले आहे.

त्यामुळे या मशिनबाबत व तिच्या वापराबाबत कुंदन भंडारी याच्याकडे चौकशी करण्यासाठी; तसेच कटर मशिन हस्तगत करण्यासाठी पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली. आरोपी कुंदन भंडारी याने अनेक मोबाईलचे सिम कार्ड आणि मोबाईल फोनचा वापर केल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे हे सिम कार्ड आणि मोबाईल फोन या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी हस्तगत करणे आवश्‍यक असल्याने आरोपीला पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांनी केली.

गुन्हा घडल्यानंतर देवदर्शन !
अभय कुरुंदकर याने आणलेल्या लाकूड कापण्याच्या कटर मशिनबाबत कुंदन भंडारी याच्याकडे विचारणा केली. ही मशिन अभय कुरुंदकर याच्या कोल्हापूर, आजरा येथील फार्म हाऊसमध्ये ठेवल्याचे सांगितले होते. पोलिसांनी केलेल्या तपासणीत हे कटर सापडले नाही. यावरून तो लाकूड कापण्याच्या कटर मशिनबाबत माहिती लपवत असल्याचे दिसून येत आहे. गुन्हा घडल्यानंतर अभय कुरुंदकर आणि वाहनचालक कुंदन भंडारी हे दोघेही तीन आठवडे एकत्र देवदर्शनासाठी सोबत फिरत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

संबंधित लेख