police officer | Sarkarnama

पोलिस अधिकारीच निघाले दरोडेखोर 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 16 एप्रिल 2017

वारणानगर येथील कोट्यावधीच्या चोरीचे प्रकरण गेली वर्षभर चर्चेत राहिले आहे. हा तपास अधिक खोलात जाऊन केल्यास याप्रकरणात आणखी काही मासे गळाला
लागण्याची शक्‍यता आहे. 
 

वारणानगर-कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीत बंद फ्लॅटमधील सुमारे सव्वा नऊ कोटी रुपयांची रक्कमेवर एका पोलिस निरीक्षकासह
कर्मचाऱ्यांनीच दरोडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सांगलीचे पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ धनवट यांच्यासह एक सहायक पोलिस
निरीक्षक, एक सहायक फौजदारासह नऊ जणांवर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांवर संगनमताने चोरीसह अपहार असे
दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनेने राज्यातील पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. 

गुन्हा दाखल झालेल्या इतर संशयितांची नांवे अशी, सांगलीचे पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट, सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद
कुरळपकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल शंकर पाटील, रवींद्र पाटील, पोलिस नाईक दीपक पाटील, कुलदीप कांबळे यांच्यासह मोहिद्दीन मुल्ला (रा. बेथलनगर, सांगली) आणि
प्रवीण भास्कर सावंत (रा. वासुद, सांगोला) अशी आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, वारणानगर येथे शिक्षक कॉलनीतील इमारत क्रमांक 5 मधील फ्लॅट क्रमांक बांधकाम व्यवसायिक झुंजार माधवराव सरनोबत
यांचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमधून 12 मार्च2016 रोजी मैनुद्दीन उर्फ मोहिद्दीन अबुबकर मुल्ला (वय 42, रा. बेथेलहेमनगर, मिरज) याने सुमारे साडेतीन कोटी रुपयांची
चोरी केली. याबाबत सरनोबत यांनी कोडोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी चोरटा मैनुद्दीन याला अटक करून चोरीतील 3 कोटी 7 लाख 63
हजाराची रोकड पोलिसांनी जप्त केली. चौकशी दरम्यान त्यांनी मैनुद्दीन याला चौकशीसाठी पुन्हा वारणानगर येथील संबंधित इमारतीतत नेले. त्याठिकाणी पोलिसांना
पुन्हा सुमारे दीड कोटींची रक्कम पोलिसांना मिळून आली. ती त्यांनी जप्त केली. चौकशीत मैनुद्दीन यांने चोरलेली रक्कम पोत्यातून भरून मिरजेतील घरात
आणल्याची पोलिसांनी कबुली दिली होती. त्यामुळे फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी शिक्षण संस्थेतील
पदाधिकाऱ्यांसह अनेकांची चौकशी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केली होती. 

वारणानगर येथील इमारतीत कोट्यावधीची रक्कम होती. त्याचा सर्वांगीण तपास व्हावा, ती रक्कम नेमकी कोणाची आहे याची चौकशी करून सत्य जनतेसमोर
आणावे अशी तक्रार शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांच्याकडे केली होती. त्याअनुषंगाने नांगरे-पाटील
यांनी याप्रकरणी चौकशीचे अधिकार अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांना दिले. शर्मा यांनी या प्रकरणी गेली साडेतीन महिने तपास केला. त्यात धक्कादायक
माहिती पुढे आली. झुंजार सरनोबत यांच्या मालकीच्या फ्लॅटमधून चोरील गेलेल्या रक्कमेच्या तपासा दरम्यान 13 मार्च 2016 रोजी सुमारे 6 कोटीची रक्कम तर
15 मार्च 2016 रोजी 3 कोटी 18 लाख असे एकूण 9 कोटी 18 लाखाची रक्कम संगनमताने आणि अधिकाऱ्याचा गैरवापर करून खुद्द दोन पोलिस अधिकारी व
पाच पोलिस कर्मचाऱ्यानेच लाटल्याचे पुढे आले. याप्रकरणी झुंजार सरनोबत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोडोली पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले.
यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ घनवटसह दोन पोलिस अधिकारी, पाच कर्मचाऱ्यांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला.
त्यांच्यावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले. या सर्वांवर कलम 454, 380, 120 (ब), 166, 411सह 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा
पुढील तपास करवीर पोलिस उपअधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. 

 

संबंधित लेख