police issue notice against suvendra gandhi and vikram rathod | Sarkarnama

नगरमधील खासदार, आमदारांची मुले तडीपार होणार?

मुरलीधर कराळे
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

त्यानंतर मंगळवार (ता. २०) पासून संबंधितांना जिल्हयाबाहेर रहावे लागणार आहे.  

नगर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या, गुन्हे दाखल असलेल्या २४१ राजकीय कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यात खासदारपूत्र सुवेंद्र गांधी, माजी आमदारपुत्र विक्रम राठोड, महापौर सुरेखा कदम यांचे पती संभाजी कदम यांच्यासोबतच आजीमाजी नगरसेवकांचा समावेश आहे.

गणेशोत्सवातही तीच स्थिती होती. इच्छुक उमेदवारांवरही तडीपारीची टांगती तलवार आहे.  गणेशोत्सवाच्या काळात नगर शहरातील सुमारे पाचशे प्रमुख व्यक्ती तडीपार होत्या. ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, असे मंडळाचे अध्यक्ष, कार्यकर्ते, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी आदींचाही त्यात समावेश होता.

मागील दोन वर्षांत घडलेल्या घटना, आंदोलने, मोर्चे पाहता ही कारवाई करण्यात आली होती. आता महापालिकेची निडणूक पारदर्शीपणे व्हावी, वातावरणात बाधा आणू नये, यासाठी पोलिसांनी नुकत्याच २४१ जणांना तडीपारीच्या नोटीसा बजाविल्या आहेत. पोलिस ठाण्यातून आलेल्या प्रस्तावात भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे पूत्र नगरसेवक सुवेंद्र गांधी, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचे पूत्र विक्रम राठोड,  सुरेखा कदम यांचे पती संभाजी कदम तसेच माजी नगरसेवक असलेले किशोर डागवाले, सुभाष लोंढे, सुनील कोतकर, विकी जगताप, संजय डापसे, अनिता दिघे, संजय खताडे, आसाराम कावरे, नरेंद्र कुलकर्णी, बाळासाहेब बोराटे, हर्षवर्धन कोतकर आदींचाही हद्दपारीच्या नोटीसीमध्ये समावेश आहे.

विशेष म्हणजे यातील बहुतेक कार्यकर्ते महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. संबंधित पक्षाने त्यांची उमेदवारी जाहीरही केली आहे. त्यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे. गुन्हेगारीची तीव्रता पाहून कोणावर कोणती कारवाई करायची, ते जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन ठरविणार असले. त्यानंतर मंगळवार (ता. २०) पासून संबंधितांना जिल्हयाबाहेर रहावे लागणार आहे.  

संबंधित लेख