पुणे, सोलापूर, नालासोपाऱ्यात धमाका करण्याचा प्लॅन उधळला : ATS ची कारवाई

पुणे, सोलापूर, नालासोपाऱ्यात धमाका करण्याचा प्लॅन उधळला : ATS ची कारवाई

मुंबई :: राज्यातील प्रमुख महानगरांमध्ये घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या तीन सदस्यांना राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी अटक केली. वैभव सुभाष राऊत, शरद भाऊसाहेब कळसकर आणि सुधनवा सुधीर गोंधळेकर अशी त्यांची नावे आहेत.

राऊत आणि कळसकरला मुंबईनजीकच्या नालासोपारा येथून, तर गोंधळेकरला पुण्यातून अटक करण्यात आली. एटीएसच्या पथकाने राऊतच्या घरी टाकलेल्या छाप्यादरम्यान कमी तीव्रतेचे 20 गावठी बॉम्ब, जिलेटीनच्या दोन काड्या, 22 नॉन इलेक्‍ट्रॉनिक डिटोनेटर्स, विषाच्या दोन बाटल्यांसह बॉम्ब बनवण्यासाठी लागणारी सामग्री जप्त केली. तिघांनाही शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्या चौकशीतून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्‍यता आहे.

काही व्यक्ती प्रमुख महानगरांमध्ये घातपात घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली होती. त्याआधारे या पथकाने गुरुवारी रात्री नालासोपारा येथील भंडारआळीत राहणाऱ्या राऊतच्या दुकानावर स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. तेथून

20 गावठी बॉम्ब, जिलेटीनच्या दोन काड्या, 22 नॉन इलेक्‍ट्रॉनिक डिटोनेटर्स, सेफ्टी फ्युज वायर, तीन स्विच, पेपरमध्ये असलेली पावडर, बॅटरी, एक्‍सोब्लेड, कटर, सोल्युशन, सहा ट्रान्झिस्टर, वायरचे तुकडे, एक सर्किट जप्त करण्यात आले. या पथकाने नंतर कळसकरच्या घरातून काही कागदपत्रे जप्त केली. स्फोटासाठी लागणाऱ्या वस्तू कशा जोडाव्यात याचे नकाशेही त्यात होते. राऊत आणि कळसकरच्या चौकशीतून सुधनवाचे नाव पुढे आले. एटीएसच्या पथकाने शुक्रवारी सकाळी त्याला पुण्यातून ताब्यात घेतले. मूळचा सातारचा असलेला सुधनवा एका संघटनेचा पदाधिकारी आहे. त्याने अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम केला आहे.

सामग्रीतून 50 बॉम्ब बनले असते

बॉम्ब बनवताना सहसा विष वापरले जात नाही; पण राऊत याच्या दुकानात विषाच्या दोन बाटल्या सापडल्या. छाप्यादरम्यान जप्त केलेल्या सामग्रीतून आणखी 50 बॉम्ब बनवता आले असते. तेथून जप्त केलेले बॉम्ब कमी तीव्रतेचे आहेत. ते काही आठवड्यांपूर्वीच तयार करण्यात आले असावेत, असा एटीएसला संशय आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएस न्यायवैद्यक प्रयोगशाळेची मदत घेणार आहे.

दाभोलकर, पानसरे हत्येशी संबंध?

काही व्यक्ती घातपात घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तांत्रिक तपासानंतर एटीएसचे पथक नालासोपारा येथे गेले. ते तीन दिवस तेथे तळ ठोकून होते. त्यांचे लक्ष्य कोण होते? नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश, गोविंद पानसरे यांच्या हत्येशी त्यांचा संबध आहे का, या दृष्टीनेही एटीएस तपास करत आहे. स्वातंत्र्यदिनी ते घातपास घडवण्याच्या तयारीत होते का, याबाबतची चौकशी केली जाणार आहे. जप्त करण्यात आलेले बॉम्ब कोणी बनवले, ते कुठे ठेवण्यात येणार होते, त्या तिघांवर कोणती जबाबदारी सोपवण्यात आली होती, याचाही तपास होणार आहे. या प्रकरणी एटीएसने 15 जणांची चौकशी केली आहे. तपासासाठी एटीएस सायबर गुन्हे शाखेचीही मदत 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com