Police Deported 5 Corporators from Malegaon | Sarkarnama

मालेगावचे पाच नगरसेवक हद्दपार-नेत्यांना शाॅक

संपत देवगिरे
मंगळवार, 2 मे 2017

मालेगावमधून हद्दपार केलेल्यांत काँग्रेसचे शेख रफीक शेख अफजल, सध्या तिसरा महाजचे व राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधीत महंमंद अमीन महंमंद फारुख आणि महंमद सुलतान महंमद हरुन उर्फ लहुदादा, रिपब्लिकन पार्टीचे (आठवले गट) विठ्ठल भिका बर्वे (गौतमनगर) आणि शिवसेनेचे   तानाजी उर्फ अशोक नारायण देशमुख या विद्यमान नगरसेवकांचा समावेष आहे.

मालेगाव - मालेगाव महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत वाद-विवाद आणि राजकारण्यांच्या गुन्हेगारांशी संबंधांसाठी प्रसिध्द असलेल्या पाच विद्यमान आणि पाच माजी नगरसेवकांना हद्दपार करुन पोलिसांनी राजकीय नेत्यांना 'शाॅक' दिला आहे. त्यामुळे उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असतांना काहींचे गणिते बिघडणार आहेत.

महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज तिसरा दिवस आहे. मात्र अद्याप अधिकृत उमेदवार निश्चित नसल्याने अद्याप कोणीही अर्ज दाखल केलेले नाहीत. या अनिश्चिततेच आज पोलिस उपअधिक्षक गजानन राजमाने यांनी 29 जणांवर हद्दपारीचे आदेश बजावले. यातील बारा राजकीय नेते आहेत. त्यांना 31 मे पर्यंत शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने प्रवेश दिल्यास मतदानासाठी त्यांना शहरात एक तास प्रवेश दिला जाईल. कायदा व सुव्यवस्था आणि निवडणूका शांततेत पार पाडण्यासाठी ही कार्यवाही केल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

हद्दपार केलेल्यांत काँग्रेसचे शेख रफीक शेख अफजल, सध्या तिसरा महाजचे व राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधीत महंमंद अमीन महंमंद फारुख आणि महंमद सुलतान महंमद हरुन उर्फ लहुदादा, रिपब्लिकन पार्टीचे (आठवले गट) विठ्ठल भिका बर्वे (गौतमनगर) आणि शिवसेनेचे   तानाजी उर्फ अशोक नारायण देशमुख या विद्यमान नगरसेवकांचा समावेष आहे. देशमुख यांच्या पत्नी यंदा उमेदवारी दाखल करणार होत्या.

याशिवाय माजी नगरसेवक महंमद रिझवान, दिवंगत नेते निहाल अहमद यांचा पुतण्या आतिक अहमद कमाल अहमद, मौलाना मोईन अशरफ, उपमहापौर युनुस ईसा यांचा मुलगा आणि 'एमआयएम'चा नेता अब्दुल माजीद महंमद युनुस आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे  दामु चव्हाण या चार माजी नगरसेवकांचाही हद्दपार केलेल्यांमध्ये समावेश आहे.

यामध्ये भाजपमध्ये प्रवेशास इच्छुक तसेच भाजपशी संबंधीत कोणीही नेता नसल्याने या आदेशामागे राजकीय खेळी असल्याची चर्चा आहे. त्यातून निवडणुकीच्या व्युव्हरचनेवर निश्चितच परिणाम होणार असल्याने काही नेत्यांची गणिते विस्कटणार आहेत. त्यामुळे या आदेशाला न्यायालयात आव्हान देण्याच्या हालचालीही सुरु झाल्या आहेत.

संबंधित लेख