Police Constables son to become Assistent Commandant | Sarkarnama

पोलीस हवालदार खैरनारांच्या मुलाची असिस्टंट कमाडंट पदाला गवसणी 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 11 जुलै 2018

अभिजितचे वडील कैलास खैरनार पोलिस दलात हवालदार आहेत. सध्यांची त्यांची नेमणूक सटाणा पोलिस ठाण्यात आहे. आई आशा गृहिणी तर भाऊ भूषण एम. कॉम. चे शिक्षण घेत आहे. वडिल पोलिस हवालदार असल्याने मुलांनी पोलिस दलात मोठ्या पदावर काम करावे ही त्यांची इच्छा होती.

नाशिक : पालकांचे सर्वात मोठे समाधान मुलांच्या यशात असते. आपला मुलगा पोलिस अधिकारी व्हावा असे स्वप्न येथील पोलिस हवालदार कैलास खैरनार यांनी पाहिले. मुलगा अभिजित यानेही दहा तासांच्या नियमीत अभ्यास व सरावातुन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेला गवसणी घातली. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात उप अधिक्षकपदी त्याची निवड झाली. मुलाने अथक परिश्रमातुन वडिलांचे हे स्वप्न पुर्ण केल्याने खैरनार कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

अभिजितचे वडील कैलास खैरनार पोलिस दलात हवालदार आहेत. सध्यांची त्यांची नेमणूक सटाणा पोलिस ठाण्यात आहे. आई आशा गृहिणी तर भाऊ भूषण एम. कॉम. चे शिक्षण घेत आहे. वडिल पोलिस हवालदार असल्याने मुलांनी पोलिस दलात मोठ्या पदावर काम करावे ही त्यांची इच्छा होती. मराठा विद्या प्रसार संस्थेच्या मराठा हायस्कुल, के. टी. एच. एम. महाविद्यालयात त्याने शिक्षण घेतले. नाशिकच्या संदीप इन्स्टिट्युटमधून अभियांत्रीकीची पदवी पूर्ण केली. 2014 पासूनच त्याने स्पर्धा परिक्षेची तयारी सुरु केली. पुणे येथे दोन सराव वर्गात भाग घेऊन रोज दहा तासांच्या नियमित अभ्यास केला.

'युपीएससी'च्या सिलॅबसनुसार अभ्यासावर त्यांचा भर होता. सलग चार वर्षांच्या परिश्रमानंतर उत्तीर्ण होऊन केंद्रीय सशस्त्र दलात उप अधिक्षक (असीस्टंट कमांडट) पदी त्याची निवड झाली आहे. यातून त्यांने वडिल आणि आईचे स्वप्न पूर्ण केले.

माझ्या यशाचे श्रेय सहजयोग ध्यान, आई-वडिलांची प्रेरणा यांना आहे. विद्यार्थ्यांनी मनापासून व ध्येयाने परिक्षेची तयारी केल्यास यश अवघड नसते - अभिजित खैरनार. 

संबंधित लेख