police camp in Chakan, 10 crore loss due to violence | Sarkarnama

चाकणला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप; आंदोलनात दहा कोटींचे नुकसान

हरिदास कड
मंगळवार, 31 जुलै 2018

चाकण : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी निघालेल्या मोर्चानंतर चाकणमध्ये काल हिंसाचार उफाळला.  हिंसाचाराच्या घटनेनंतर शहरात व परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढला आहे. रस्त्यावर पोलिसांची वाहने लावण्यात आली आहे. पोलिसांच्या वाहनांची शहरातून काही मिनिटाला ये- जा चालू आहे. सायरनचे आवाज घोंघावत वाहने जात आहेत. त्यामुळे शहराला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे.

जनजीवन सुरळीत आहे. पण, वीस टक्के दुकानदारांनी भीतीपोटी दुकाने उघडली नाहीत. इतर दुकाने व कार्यालये आज सुरळीत सुरू होती. सोमवारच्या तणावपूर्ण परिस्थितीने जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा, हायस्कूल व खासगी शाळांनी सुट्या दिल्या होत्या. तसे, संदेश भ्रमणध्वनीवरून फिरविण्यात आले होते. पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्याची धास्ती घेतली होती, असे चित्र होते. 

जमावबंदी आदेशाची अफवा 

शहरात जमावबंदीचा आदेश लागू केलेला नाही, असे स्पष्टीकरण जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले. जमावबंदी लागू असल्याची अफवा मात्र काही जण पसरवीत होते. दरम्यान, व्यावसायिकांनी दुकाने सुरू ठेवून हिंसाचाराचा प्रकार निंदनीय असल्याचे सांगितले. बहुतांश राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी हिंसाचार चुकीचा असल्याचे सांगितले. 

येथील उसळलेल्या हिंसक आंदोलनात सुमारे चार ते पाच हजार अज्ञातांनी सुमारे 35 वाहनांची जाळपोळ व तोडफोड करून नुकसान केले आहे. या हिंसाचारात सुमारे आठ ते दहा कोटींचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील व पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिली. याबाबत पोलिस ठाण्यात फौजदार प्रशांत पवार यांनी तक्रार दिली आहे.

त्यानुसार सार्वजनिक संपत्ती हानी प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार चार ते पाच हजार अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी महसूल विभागाच्या वतीने चाकणचे मंडलाधिकारी बाळकृष्ण साळुंखे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी नुकसानग्रस्त गाड्यांचा पंचनामा केला. झालेले नुकसान मोठ्या प्रमाणात असून, बुधवारी (ता. 1) दुपारपर्यंत नुकसानीचा नक्की आकडा कळेल, असे मंडलाधिकारी साळुंखे यांनी सांगितले. 

संबंधित लेख