police alert after udyanrajes entry in satara | Sarkarnama

उदयनराजे आल्याचे कळताच पोलिस पळाले आणि त्यांनी रामराजेंच्या खोलीला कुलूप लावले! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर शासकीय विश्रामगृहात असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांची "एन्ट्री' झाल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. वादाचा प्रसंग उद्‌भवू नये, यासाठी सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी रामराजे उपस्थित असलेल्या खोलीला चक्क कुलूप लावले. 

सातारा : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर शासकीय विश्रामगृहात असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांची "एन्ट्री' झाल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. वादाचा प्रसंग उद्‌भवू नये, यासाठी सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी रामराजे उपस्थित असलेल्या खोलीला चक्क कुलूप लावले. 

उदयनराजे व रामराजे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. मध्यंतरी उदयनराजेंनी फलटणमध्ये जाऊन रामराजेंना आव्हान दिले. त्यानंतर त्यांच्या विरोधात फलटणकरांकडूनही आवाज उठवला गेला. काही दिवसांपुर्वी रामराजे शासकीय विश्रामगृहात असताना खासदार उदयनराजेंनी विश्रामगृहात जाऊन त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी प्रसंगावधान राखून पोलिस अधीक्षक संदीप पाटील तातडीने विश्रामगृहात आले व त्यांनी उदयनराजेंना रामराजेंच्या कक्षात जाण्यापासून रोखले होते. त्यावर काही दिवसांपूर्वी रामराजेंनी वेळ आल्यावर मी बाण सोडणार असे सूचक उत्तर दिले होते. त्यामुळे दोघांमधील वाद धुमसतच आहे. त्यामुळे दोघे एकाच ठिकाणी आल्यास पोलिसांची तारांबळ उडते. असाच प्रकार काल (रविवारी) दुपारी सातारा शासकीय विश्रामगृहात झाला. 

सभापती रामराजे नाईक निंबाळकर गेल्या दोन दिवसांपासून साताऱ्यात आहेत. काल रात्री ते विश्रामगृहातील व्हीआयपी कक्षातच मुक्कामाला होते. रविवारी त्यांनी काही बैठका घेतल्या. दुपारी सव्वादोनच्या सुमारास ते कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्याबरोबर चर्चा करत होते. या वेळी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. याच वेळी उदयनराजे यांची गाडी विश्रामगृहाच्या पॅसेजमध्ये आली. त्यामुळे तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची तारांबळ उडाली. उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांना रामराजेंची गाडी दिसल्यामुळे तणाव निर्माण होतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. 

मात्र, पोलिसांनी आणि काही कार्यकर्त्यांनी तत्काळ ज्या कक्षात कोणी नाही त्या कक्षांना कुलूप लावून टाकले, तसेच रामराजे होते त्या व्हीआयपी कक्षाला आतून कडी लावली, तसेच बाहेरून कुलूप लावले. याच वेळी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पत्रकार परिषदेसाठी उठून गेले. दरम्यान, बाहेर दुसऱ्या कक्षात उदयनराजे आले असल्याची कल्पना रामराजेंना नव्हती. थोड्याच वेळात त्यांना याची माहिती मिळाली. त्यानंतर ते काहीवेळाने लोणंदला गेले. त्यानंतर उदयनराजेही त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत बाहेर निघून गेले. 

संबंधित लेख