police action in chakan | Sarkarnama

चाकण हिंसाचारप्रकरणी पोलिसांची यादी आणि पैशाचा पाऊस, याची चर्चा

हरिदास कड
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

चाकण : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून चाकणमध्ये झालेल्या आंदोलनात मोठा हिंसाचार झाला. जाळपोळ, तोडफोड झाली. यात स्थानिक तरूणांना काही गावपुढारी आणि गुन्हेगार यांच्या इशाऱ्यावर पोलिसांनी गुंतवण्याचा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे तरूण मुलांनी गावे सोडली आहेत. पोलिस कधीही घरी येतात त्यामुळे नातेवाईक, कुटुंब भयभीत झाले आहेत.

चाकण : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून चाकणमध्ये झालेल्या आंदोलनात मोठा हिंसाचार झाला. जाळपोळ, तोडफोड झाली. यात स्थानिक तरूणांना काही गावपुढारी आणि गुन्हेगार यांच्या इशाऱ्यावर पोलिसांनी गुंतवण्याचा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे तरूण मुलांनी गावे सोडली आहेत. पोलिस कधीही घरी येतात त्यामुळे नातेवाईक, कुटुंब भयभीत झाले आहेत.

हिंसाचार करणाऱ्या निगडी परिसरातील बाह्यशक्ती असून त्यांचा शोध पोलिस घेतला जात नाही.  गावागावातील तरूणांची यादी पोलिस बनवत असून यादीतून नाव काढून टाकण्यासाठीचे भाव पोलिसांनी बनविले आहेत अगदी पंचवीस हजारापासून एक लाख रूपयापर्यंत हे भाव आहेत. पोलिस त्यांच्या मध्यस्थांकरवी पैसे घेत आहेत. त्यामुळे पोलिसांची यादी आणि पैशाचा पाऊस याची चर्चा चाकण परिसरात सध्या सुरू आहे. 

ज्या कुटुंबाना , नातेवाईकांना पोलिसांचा त्रास होत आहे ते भीतीने प्रसिध्दीमाध्यमांकडे जात आहेत. पाच हजार अज्ञातांवर गुन्हे दाखल आहेत. मग आमच्या मुलांवरच कारवाई का, सगळ्यांवर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांची आहे.

दरम्यान याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तपासी पोलिस अधिकारी दयानंद गावडे यांनी सांगितले की, कोण पैसे मागत असेल तर त्यांची नावे आम्हाला सांगा, कोणीही पैसे मागत नाही. पैसे मागण्याचे आरोप खोटे आहेत. आम्ही योग्य ती कारवाई करत असून ज्यांचा सहभाग आहे त्यांना ताब्यात घेतो आहे.

चाकणच्या हिंसाचारानंतर हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे. गावपुढारी , पोलिस ठाण्याचे एजंट व इतर गुन्हेगार यांच्या मदतीने संशयितांच्या नावांची यादी केली जात आहे. यात कोणाच्या घरातील तरूण गुंतवावा,  कोणाला गुंतविले तर पैसे अधिक मिळतील याची खातरजमा करून पोलिस त्या तरूणांच्या मागे धावत आहेत. याबाबत पोलिसांच्या चाकणमधील काही हाॅटेल, गावांत संबंधित गावपुढारी, पोलिसांचे एजंट यांच्या बैठका होत आहेत.

सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासून त्यांच्यावर कारवाई करावी. जे रस्त्यावर उभे आहेत ,ज्यांच्या हातात झेंडे, काठ्या आहेत ते सहभागी आहेत म्हणून कारवाई करू नये असे तरूणांच्या कुटुंबाचे तसेच ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबतच्या तक्रारी नागरिक राजकीय नेते, पुढारी यांच्याकडेही करत आहेत. 

चाकण हिंसाचार ज्यांनी घडविला त्यांचे पुणे, औरंगाबाद असे काही कनेक्शन आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे. ज्या पद्धतीने चाकणमध्ये हिंसाचार झाला तशीच  जाळपोळ औरंगाबादला झाली. यामागचा मास्टरमाइंड कोण आहे, याचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी पुढे आली आहे.

संबंधित लेख