मेहेंदीप्रकरणात खबऱ्याची अचूक टीप आणि पोलिसांची धडक कारवाई यशस्वी...

  मेहेंदीप्रकरणात खबऱ्याची अचूक टीप आणि पोलिसांची धडक कारवाई यशस्वी...

औरंगाबाद : सिरीयल किलर इमरान मेहंदी याला न्यायालयाच्या परिसरातून पळवून नेण्याचा कट पोलिसांनी खबऱ्याच्या अचूक टीप आणि माहितीच्या जोरावर उधळून लावला. मध्यप्रदेशातुन आलेले 7 शार्प शूटर आणि स्थानिक चार गुंडांच्या मुसक्‍या आवळत पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली. आरोपी शहरात कुठे थांबले आहेत कोणत्या हॉटेलात थांबले त्यांचे साथीदार कोण याची इत्थंभूत माहिती पोलिसांना मिळाली होती, त्याआधारे सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलिसांनी नारेगाव परिसरात सापळा रचला. 

गेल्या वेळच्या सुनावणीवेळी न्यायालयात मेहंदी समर्थक व कुरेशी समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. यात पाच जण गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे यावेळची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याचा निर्णय तुरुंग प्रशासनाने घेतला होता. परंतु आवाज नीट येत नसल्याचा बहाणा करत इम्रान मेहंदीने मला न्यायालयातच सुनावणीसाठी घेऊन जा अशी मागणी लावून धरली होती. अर्थात यामागे त्याचा हेतू वेगळा होता. हीच संधी साधत इमरानला पळून जायचे होते. 

न्यायालयात येण्याआधी इम्रानच्या एका साथीदाराने त्याची तुरुंगात भेट घेतली होती अशीही माहिती समोर आली आहे. यावेळी तुला पळवून नेण्याचा प्लॅन आखण्यात आल्याची माहिती बहुदा इमरानला मिळाली होती अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. पण वेळीच सतर्क झालेल्या पोलिसांनी मेहंदी गॅंगचा कट उधळून लावला. पोलीस निरीक्षक मधुकर सावंत व त्यांच्या टीमने दिल्ली गेट पासून शोध मोहीम सुरू केली तेव्हा मध्यप्रदेश पासिंगची चिखलाने माखलेली तवेरा गाडी पोलिसांना दिसली. 

भरधाव वेगाने ही गाडी त्यांच्या समोरून गेल्याने दिल्ली गेट ते कटकट गेट मार्गावर तैनात असलेल्या टीमला त्यांचा पाठलाग करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सकाळी साडेनऊ वाजता तवेरा गाडी कटकट गेटच्या जवळ आली आणि काही मिनिटं थांबून नारेगावच्या दिशेने निघाली. पोलिसांच्या एका टीमने लगेच या गाडीचा पाठलाग सुरू केला नारेगावातील एका देशी दारूच्या दुकानाजवळ ही गाडी थांबली. यापैकी एकाने गाडीतून उतरून दारूची बाटली विकत घेतली. या गाडीच्या पुढे मोटार सायकलवर तिघेजण तर तवेराच्यामागे एका सॅंट्रो गाडीत एकजण होता.नारेगाव जवळच्या लहुजी साळवे चौकात पोलिसांनी सापळा रचत या सर्व आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या यावेळी एकाने कमरेची पिस्तूल काढून ती पोलिसांवर रोखली. पण इतरांनी झडप घालून त्यांना ताब्यात घेतले. रविवारी रात्री नऊ वाजता पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सहकाऱ्यांना या ऑपरेशनची माहिती दिली, आणि पहाटे हजर राहण्यास सांगितले होते. एकीकडे नारेगाव येथे पोलिसांनी मोहीम राबवत शार्प शूटर आणि इम्रानच्या साथीदारांना अटक केली, तर दुसरीकडे दुपारी न्यायालय परिसरात त्याचा एक साथीदार पिस्तुलसह हजर होता अशीही माहिती समोर आली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com