खासदार आढळरावांच्या कामगिरींचे मोदींकडून कौतुक; शिवसेनेच्या वाघाची कामगिरी घरोघरी पोहोचविणार

खासदार आढळरावांच्या कामगिरींचे मोदींकडून कौतुक; शिवसेनेच्या वाघाची कामगिरी घरोघरी पोहोचविणार

शिक्रापूर :  खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या गेल्या पाच वर्षांतील कामाचे आणि त्यांच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच खास पत्र पाठवून केले. पुणे-नाशिक रेल्वेच्या प्रकल्पाबाबत केलेल्या पाठपूराव्याबद्दल तर त्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

या पत्राचा समावेश असलेला गेल्या पाच वर्षातील १४ हजार कोटींच्या कामांचा कार्यअहवाल मतदार संघातील प्रत्येक कुटुंबांपर्यंत पोहचविण्याचे काम सुरू केल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव यांनी नुकतीच दिली. 
लोकसभेचे तीन वेळा सदस्य म्हणून कार्यरत राहिलेले खासदार शिवाजीराव आढळराव हे गेली दोन पंचवार्षिक शिरुर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. भोसरी, आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरुर-हवेली व हडपसर विधानसभा मतदार संघाचा समावेश असलेल्या या मतदार संघात ७०० ग्रामपंचायती, सहा नगर परिषदा आणि दोन महापालिकांचा समावेश आहे. जुन्नर-खेड-आंबेगाव मधील पूर्ण आदिवासी भाग ते अत्यंत पुढारलेला हडपसर-भोसरीमध्ये हा मतदार संघ विखुरलेला आहे. पर्यायाने या सर्व भागातील विविध कामांसाठीचा पाठपूरावा आढळराव यांची पूर्ण क्षमता पणाला लावणारा ठरला आणि याच कामाने त्यांचा गौरव थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवून केला आहे. 

याच अभिनंदन व कौतुकाच्या पत्रांचा आणि पाच वर्षात १४ हजार कोटींच्या विविध विकास कामांची पूर्ण आकडेवारीसह माहिती देणारा अहवाल नुकताच मतदार संघातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचविण्याचे काम सुरू केले आहे. या अहवालात २४५० कोटींचा पुणे-नाशिक महामार्ग, ७५०० कोटींची पुणे-नाशिक रेल्वे, २००० कोटींचा तळेगाव-चाकण-शिक्रापूर-न्हावरा-चौफुला हा ११० किलोमिटरचा महामार्ग, ८३६ कोटींचा अष्टविनायक देवस्थान महामार्ग, ७०० कोटींच्या बनकरफाटा-भिमाशंकर-वाडा-खेड हा भारतमाला परियोजनेतील महामार्ग, ११ कोटींचा केंद्रीय मार्ग निधी योजनेतील राजगुरुनगर येथील पुल, १६६ कोटींचा कल्याण-माळशेज-आणे-अहमदनगर महामार्ग, २८ कोटींचा घोरपडीतील उड्डाणपूल, ५० कोटींचा मांजरी येथील उड्डाणपूल, १११ कोटींची राष्ट्रीय पेयजल योजना आदींची विस्तृत माहिती या अहवालात दिली आहे.

या शिवाय भोसरी भागातील शास्तीकर माफी, रेडझोन प्रश्नी थेट तत्कालीन केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना भोसरीत येवून विशेष बैठक घ्यायला लावण्यापर्यंतचे प्रयत्न, जिल्हा नियोजन मंडळ, पीएमआरडीए आदींच्या बैठकीत विविध कामांसाठीचा पाठपूरावा व कामे मंजुर करुन घेतल्याच्या माहितीचा या अहवालात समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान या संपूर्ण कामाचा, विस्तिर्ण मतदार संघात चौफेर दृष्टी ठेवून केलेल्या प्रयत्नांची आणि विकासाबाबत कल्पकता व दूरदृष्टी असल्याचे पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढळराव यांना पत्र पाठवून कौतुक केले आहे. याच अहवालाचे वितरण ते स्वत:, भाजपा-शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी करीत असून हडपसर येथे त्यांचे चिरंजीव अक्षय आढळराव-पाटील करीत असल्याची माहिती आमदार योगेश टिळेकर यांनी दिली.

आढळराव दोन वेळा `संसद रत्न`  
१६ व्या लोकसभेत उपस्थित केलेले ११०७ प्रश्न, संसदेतील ४६ प्रश्नांवर चर्चेतील सहभाग आणि १३ खाजगी विधेयके सादर करुन संसद गाजविलेले खासदार शिवाजीराव आढळराव यांना दोन वेळा संसद-रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ते केवळ त्यांच्या याच कामगिरीने. पर्यायाने याच कामगिरीची दखल मोदींनी घेतली आणि आढळराव यांना कौतुकाचे पत्रही त्यांनी लगेच पाठविले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com