pmc byelction in mundhava | Sarkarnama

मुंढव्यातील पोटनिवडणूक बिनविरोध होणार की भाजप लढणार?

उमेश घोंगडे
शुक्रवार, 9 मार्च 2018

पुणे : माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मुंढवा-मगरपट्टा सिटी प्रभागातून भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार की कोद्रे यांच्या घरातील उमेदवार असल्यास जागा बिनविरोध सोडणार, या विषयी राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे.

 

पुणे : माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मुंढवा-मगरपट्टा सिटी प्रभागातून भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार की कोद्रे यांच्या घरातील उमेदवार असल्यास जागा बिनविरोध सोडणार, या विषयी राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे.

 

कोद्रे कुटुंबातीलच उमेदवार देण्याची तयारी राष्ट्रवादी क्रॉंग्रेसने चालवली आहे. मात्र  कोणाला उमेदवारी द्यायची याचा अद्याप त्या कुटुंबाने निर्णय घेतला नसल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत येत्या बुधवारपर्यंत याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे `सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले.

कैलास कोद्रे यांच्या धाकट्या सून पूजा आणि मुलगी स्मिता लडकत-कोद्रे असे दोन पर्याय या कुटुंबासमोर आहेत. स्मिता या भाजपचे नगरसेवक महेश लडकत यांच्या भावजय आहेत. स्मिता यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यास त्याविरोधात भाजप उमेदवार देणार नाही, अशी चर्चा सध्या सोशल मिडियात सुरू झाली आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर कोद्रे कुटुंबियांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल. लडकत यांचे घर भाजपचे असले तरी त्याची उमेदवारीसाठी आडकाठी असू शकत नाही. लोकशाहीत एक भाऊ एका पक्षात आणि दुसरा भाऊ दुसऱ्याच पक्षात असू शकतो. मात्र यावर अद्याप निर्णय झालेला नाही, असे सांगितले.

गेल्यावेळी भाजपच्या उमेदवार राहिलेल्या सुकन्या गायकवाड यावेळीदेखील पुन्हा इच्छुक आहेत. गेल्यावेळी जोरदार लढत दिलेल्या गायकवाड यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याची भूमिका भाजपमधील बहुसंख्य पदाधिकाऱ्यांची आहे. मात्र पक्षातील वरिष्ठांकडून दबाव आणून गायकवाड यांच्याऐवजी अन्य उमेदवाराला संधी देण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

भाजपचे हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांचीही भूमिका यात महत्त्वाची ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मतदारसंघातील मांजरीसारख्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नेटाने लक्ष टिळेकर यांनी घातले होते. ही ग्रामपंचायत त्यांनी भाजपकडे खेचून आणली. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेची मुंढव्यातील पोटनिवडणूक होत असल्याने ते या निवडणुकीकडे गंभीरपणे पाहणार का, याबाबत विविध मते व्यक्त होत आहेत. या निवडणुकीसाठी १३ ते २० मार्चपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे.

 

संबंधित लेख